कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जाण्याने रयत शिक्षण संस्थेचा कोसळलेला वटवृक्ष उभा करण्याचे काम कार्याध्यक्ष व विधिज्ञ रावसाहेब शिंदे यांनी केले. अनेक वेगळे प्रयोग त्यांनी करून दाखविले. हे काम पुढे नेण्याची भूमिका महत्त्वाची आहे, अशी श्रद्धांजली माजी केंद्रीय मंत्री व संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी वाहिली.
पवार म्हणाले, कर्मवीर अण्णांच्या जाण्याने कोसळलेला वटवृक्ष सेवकांनी उभा केला. तो समर्थपणे सांभाळण्याचे काम रावसाहेबांनी केले. बंधू अण्णासाहेबांप्रमाणे सामाजिक, सहकारी चळवळ वेगळय़ा दिशेने नेण्याची कामगिरी केली. दत्ता देशमुख यांच्यासह त्यांनी शेतमजूर, शेतकरीहिताची जपणूक करण्यासाठी सामूहिक शक्ती निर्माण केली. पु. ल. देशपांडे, ग. दि. माडगूळकर, दत्ता कांचन यांच्यासह विविध क्षेत्रांतील लोकांशी त्यांची मैत्री होती. अनेकांशी त्यांनी कौटुंबिक नाते जोडले आणि ते कायम ठेवले. कामाची प्रसिद्धी त्यांनी केली नाही. लेखणी व विचारांवर त्यांचे प्रभुत्व होते. शंकरराव काळे व शिंदे दे ही दोन मोठी माणसे रयतला मिळाली. कर्मवीरांचे काम पुढे चालू ठेवणे हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल.
माजी मंत्री पतंगराव कदम म्हणाले, शिंदे थोर विचारवंत होते. ४० वर्षांपासून रयतच्या माध्यमातून आम्ही एकत्र काम केले. त्यांच्याशी माझे घरगुती संबंध होते. ते उत्तम मार्गदर्शक होते. खासदार सदाशिव लोखंडे म्हणाले, शिंदे यांनी स्वातंत्र्यलढय़ातील योगदान तसेच साहित्य व शिक्षणक्षेत्रात महत्त्वपूर्ण काम केले. रयतच्या माध्यमातून शिक्षणात समानता आणण्याबरोबरच ग्रामीण भागातील तरुणांना विविध क्षेत्रांत संधी निर्माण करण्यासाठी त्यांनी काम केले.
माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, महात्मा गांधी व मार्क्सवादी विचारांचा त्यांच्यावर पगडा होता. विविध चळवळीत त्यांनी भाग घेतला. सरकारविरोधी आंदोलनात तुरुंगवास भोगला. साने गुरुजींबरोबर गुप्त बैठका घेतल्या. पी. बी. कडू, धर्माजी पोखरकर, पी. जी. भांगरे यांच्यासह त्यांनी समतेचा लढा दिला. देशात, परदेशात व्याख्याने दिली. त्यांची ग्रंथसंपदा मोठी होती. बाबा आमटे यांच्याबरोबर त्यांनी काम केले.
माजी मंत्री शंकरराव कोल्हे म्हणाले, भूमिगत राहून अॅड.शिंदे यांनी स्वातंत्र्यलढय़ात स्वत:ला झोकून दिले होते. सामान्यांना ते आदराचे स्थान होते. रयतमधील गुणवत्तावाढ कार्यक्रमात त्यांनी मोठे कष्ट घेतले. भाऊसाहेब कांबळे यांनीशिंदे यांच्या निधनाने श्रीरामपूरसह रयत आणि राज्याची मोठी हानी झाली. ते आदर्श व शिस्तबद्ध जीवन जगले. कधी राजकीय अभिनिवेष बाळगला नाही. स्वातंत्र्यलढा, शिक्षण व साहित्य क्षेत्रात त्यांनी अलौकिक कामगिरी केली असेही सांगितले.