सततच्या तीव्र पाणीटंचाईने लातूरकरांची शब्दश: झोप उडवली आहे. पाणीटंचाईचा रोजच्या जगण्यावर परिणाम झाला असून, पाण्यासाठी रोजच लढाई करण्याचा बाका प्रसंग सर्व जण अनुभवत आहेत.

घरगुती धुण्याभांडय़ाची कामे करून संसाराला हातभार लावणाऱ्या कुटुंबीयांसमोर अनंत अडचणी आहेत. एस.टी. डेपोमागील भागात राहणाऱ्या मेहरुन्निसा सय्यद (वय ७०) म्हणाल्या, ‘‘रोजच्या पोटाच्या खळगीसाठी धुणीभांडी करायला पर्याय

नाही.  पाणीप्रश्नामुळे आता आम्ही काम करताना घरोघरी घरमालकिणी काम संपेपर्यंत समोर उभ्या राहतात. पाणी वापरण्यावरून बोलणी खावी लागतात. आम्ही पाणी विकत घेतो, तेव्हा जपून वापरा. तुम्हाला कामाचे पसे देण्याऐवजी तेवढय़ाच पशात पत्रावळी, द्रोण खरेदी करून त्यावर जेवण केले तर पसे तरी वाचतील! दुष्काळाचे कारण पुढे करून ३०० रुपयांपेक्षा अधिक पसे द्यायला कोणी तयार नाही. दिवसभर काम करून घरी आल्यानंतर तीन रुपयाला घागर अशा किमान पाच घागरी पाणी विकत आणावे लागते. महिन्याला ४५० ते ५०० रुपयांचा अतिरिक्त खर्च पाण्यावर करावा लागतो आहे. यातून सुटका कधी होईल, हा आमच्यासमोरील प्रश्न आहे.’’

माया खरात (वय ४३) खणी भागात राहतात. पती बांधकामावर सेंट्रिंगचे काम करतो. पाणीटंचाईमुळे बांधकामे बंद झाल्यामुळे आता काम मिळत नाही. घरात पाच मुली व मुलगा. प्रपंच चालवण्यासाठी चार-पाच घरी मायाबाईंना धुणीभांडी करावी लागतात. िवधनविहिरीचे १५ घागरी पाणी ३ रुपये दराप्रमाणे विकत घ्यावे लागते. पिण्यासाठीचे पाणी मिळवणे दुरापास्त. मिळेल ते पाणी उकळून, गाळून वापरावे लागते. पाण्यासाठी महिन्याचा दीड हजार रुपयांचा अधिकचा खर्च वाढला. तो खड्डा कसा भरून काढायचा? हा खरा प्रश्न असल्याचे त्या म्हणाल्या.

अनसूयाबाई मिसाळ (वय ४८) यांची कहाणीही वेगळी नाही. पती व दोन मुले असे चौकोनी कुटुंब. मोलमजुरी करून पोट भरावे लागते. दोन किलोमीटर अंतरावरील गंजगोलाईत जाऊन उभे राहिले तरच काम मिळते. मजुरीसाठी गेले तर पाणी कुठून आणायचे? हा प्रश्न. त्यामुळे घरातील एकास पाण्यासाठी अडकून पडावे लागते. मजुरी करू की पाणी भरू? हा मोठा प्रश्न असल्याचे त्या सांगतात. प्रत्येक कुटुंबाची पाण्याची स्वतंत्र कहाणी आहे. जगण्यातील आनंद हिरावून घेणाऱ्या या पाणीप्रश्नाचा गुंता कसा सोडवायचा? हा प्रश्न विक्रम अन् वेताळाच्या कथेप्रमाणे प्रत्येकाच्या मानगुटीवर बसला आहे.