मकरसंक्रांतीनिमित्त बाजारपेठेत ग्राहकांची मोठी गर्दी लोटली. खरेदीच्या उत्साहाला भरते आल्याने व्यापारी पेठेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

महिलांच्या दृष्टीने या सणाला अधिक महत्त्व असून हळदीकुंकू, चुडे, बांगडय़ा, खण, हलवा, सुगडे व वाण लुटायच्या वस्तू खरेदीसाठी बाजारपेठेत मोठी गर्दी लोटली होती. आठवडाभरापासून बाजार फुललेला असतो. या वस्तूंबरोबरच सुगडय़ात टाकण्यासाठी जांब, गाजर, खारका, बोरं, पान-सुपारी, गूळ, तीळ अशा पदार्थाचीही मोठय़ा प्रमाणात खरेदी होते. आठवडाभरापूर्वी १८० रुपये किलोने विकले जाणारे तीळ ऐन सणाच्या दिवशी १४० रुपये किलोने फिरून विकण्याची शक्कल काही कल्पक मंडळींनी लढवली. गंजगोलाईसह विवेकानंद चौक, शिवाजी चौक, सुभाष चौक, आदर्श कॉलनी, रेणापूर नाका, प्रकाशनगर अशा ठिकाणी मकरसंक्रांतीनिमित्त विविध वस्तूंची उपलब्धता झाल्यामुळे गंजगोलाईवरील गर्दीचा ताण काही प्रमाणावर कमी झाल्याचे दिसून आले.
हळदी-कुंकवाचा भाव २४० रुपये किलो, तर किरकोळ भाव ५० ग्रॅमला १० रुपये होता. चुडय़ाची जोडी २० ते २५ रुपये, बोरांचा भाव ४० ते ६० रुपये, हलवा २० रुपयांना ५० ग्रॅम, तर गुळाचा भाव २५ रुपये किलो होता. या सणात लोटक्यांचा मान घरोघरी महत्त्वाचा मानला जातो. सुगडे असल्याशिवाय हा सण साजरा करता येत नाही, हे लक्षात घेऊन शहरात मोठय़ा प्रमाणात आजूबाजूच्या कुंभार समाजाच्या मंडळींनी विक्रीसाठी लोटके उपलब्ध केले होते. पाच लोटके व झाकणी याची किंमत ७० रुपयांपर्यंत होती. संक्रांतीनिमित्त वाण लुटण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, निरनिराळय़ा वस्तूंची विक्री मोठय़ा प्रमाणात होते. सणानंतर पुढचे १० दिवस हळदी-कुंकवासाठी एकमेकांकडे जाण्याचे असतात. त्यामुळे रिक्षेवाल्यांची कमाई मोठी असते. तिळापासून तयार केल्या जात असलेल्या बारीक व मोठय़ा हलव्याची विक्री मोठय़ा प्रमाणात होत असल्याचे चित्र बाजारपेठेत दिसत होते. रेवडय़ा, तिळाचे लाडू, फेणी, पापडी यांची विक्रीही मोठी होते.