भाजप सरकारच्या विरोधात आंदोलन करण्याच्या नियोजनासाठी बोलवण्यात आलेली काँग्रेस पदाधिका-यांची बैठक निरीक्षकांसमोरच, पक्षांतर्गत उखाळ्यापाखाळ्यांनीच अधिक गाजली. पक्षातील विखे गटाशी अलीकडेच संलग्न झालेले कोतकर समर्थक अधिक आक्रमक होते. अनेक पदाधिका-यांनी पक्षाचे काम थांबवण्याचा इशाराही दिला.
थोरात गटाच्या पुढाकारातून युवकचे अध्यक्ष अजय औसरकर यांच्यावर कारवाई झाल्याचे हे पडसाद होते. काँग्रेसने केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात महाराष्ट्रभर सोमवारी (दि. ९) रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे नियोजन करण्यासाठी जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे यांनी शुक्रवारी पक्षाच्या कार्यालयात बैठक आयोजित केली होती. त्यासाठी निरीक्षक आ. शरद रणपिसे, माजी आमदार बाळासाहेब शिवरकर, फजल अन्सारी, आ. भाऊसाहेब कांबळे, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, विनायक देशमुख, महिला जिल्हाध्यक्ष कांचन मांढरे, उपमहापौर सुवर्णा कोतकर आदी उपस्थित होत्या.
माजी नगरसेवक निखिल वारे यांनी कोतकर गटातील अस्वस्थेला तोंड फोडले. कार्यकर्त्यांना पक्षाबद्दल शंका वाटू लागली आहे. शहर कार्यालयातून कोणतेही निरोप मिळत नाहीत. पक्षाच्या नेत्यांकडून त्यांना कोणतीही ताकद मिळत नसल्याने त्यांना असुरक्षित वाटते. नेते म्हणवणारे विरोधकांना बरोबर घेऊन फिरत आहेत. निष्ठावान व नगरसेवकांना नोटिसा काढल्या जातात. त्यामुळे पक्षाकडे युवक येण्यास तयार नाहीत. त्यांना गटातटाची भीती वाटते. अन्याय होणार असेल तर आम्ही पक्षात राहावे की नाही, अशी खंत वारे यांनी व्यक्त केली. त्याला सेवादलाच्या जिल्हाध्यक्ष निलिनी गायकवाड यांनी दुजोरा देताना सेवा दलाला कोणी कमी लेखू नये असाही इशारा दिला व विधानसभेसाठी गुजरातहून आलेल्या निरीक्षकांचे वागणे योग्य नव्हते, अशी तक्रार केली. महिला शहर जिल्हाध्यक्ष सविता मोरे यांनीही ताकद मिळाली तर काम करु अन्यथा नाही, असे स्पष्ट केले.
माजी नगरसेवक बाळासाहेब पवार यांनी नगर शहरात पक्ष जिवंत आहे की नाही, असा प्रश्न केला. उबेद शेख यांनीही त्यांच्यावरील अन्यायाबद्दल खंत व्यक्त केली. अखेर रणपिसे, शिवरकर, म्हस्के, ससाणे यांनी या सर्वाना सबुरीचा सल्ला दिला. ससाणे यांनी कार्यकर्त्यांवरील अन्यायाविरुद्ध आपण त्यांच्या पाठीशी राहू, अशी ग्वाही दिली. देशमुख, प्रभारी शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण, मिठूभाई शेख आदींची भाषणे झाली.
थोरात गट बॅकफूटवर
विखे गटाचे कार्यकर्ते आक्रमक होत असताना थोरात गटाकडून कोणतेही प्रत्युत्तर दिले गेले नाही. मुळात या बैठकीकडे थोरात गटाच्या प्रमुख पदाधिका-यांनी पाठच फिरवली. विखे गटाची आक्रमकता शहर जिल्हाध्यक्षपदासाठी आसल्याची चर्चा आहे. थोरात गटाने नियुक्त केलेले शहर जिल्हाध्यक्ष चव्हाण प्रभारी आहेत. त्यांची नियुक्ती कायम करण्याचा थोरात गटाचा प्रयत्न यशस्वी झाला नाही. आता या पदासाठी विखे गटाचे निखिल वारे प्रयत्नशील आहेत