मालेगाव महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. देशभरात तोंडी तलाक आणि गोमांसाच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या भाजपने मालेगावात मात्र अगदी विरोधी भूमिका घेतली आहे. मालेगाव महापालिका निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर लढत असलेल्या शेख अख्तर यांनी तोंडी तलाक हा मुस्लिमांचा मुलभूत अधिकार असल्याचे म्हटले आहे. ‘सर्वोच्च न्यायालयाने जरी तोंडी तलाकविरोधात निकाल दिला तरी, आम्ही तो मान्य करणार नाही,’ असेदेखील अख्तर यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्र भाजपचे अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी जास्तीत जास्त मुस्लिमांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचे आवाहन केले. ‘अधिकाधिक मुस्लिमांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास अल्पसंख्यांकांसाठी सरकारी धोरणे आखणे सोपे होईल,’ असे सिद्दीकी यांनी म्हटले. मात्र सिद्दीकी बोलत असताना भाजपचे उमेदवार शेख अख्तर यांनी त्यांना रोखले. ‘तोंडी तलाक हा मुस्लिमांचा मुलभूत अधिकार आहे. याविरोधातील सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयदेखील आम्हाला अमान्य असेल,’ असे अख्तर यांनी म्हटले. पक्षाच्या भूमिकेच्या अगदी विरोधात भूमिका घेणाऱ्या अख्तर यांना शांत करण्याचा सिद्दीकी यांनी प्रयत्न केला. मात्र तो व्यर्थ ठरला. यामुळे भाजपमध्येच तोंडी तलाकच्या मुद्यावर एकमत आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

शेख अख्तर मालेगावमधील मालदा येथून निवडणूक लढवणार आहेत. मागील महापालिका निवडणुकीत अख्तर यांना २४९ मते मिळाली होती. त्यावेळी अख्तर भाजपचे सर्वाधिक मते मिळवणारे मुस्लिम उमेदवार होते. राज्यभरातील निवडणुकांमध्ये घवघवीत यश मिळवणाऱ्या भाजपने मालेगाव महापालिका काबीज करण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. २००६ आणि २००८ मध्ये मालेगावात बॉम्बस्फोट झाले होते. त्यामुळे मालेगाव अतिशय संवेदनशील भाग समजला जातो.

२०१२ च्या मालेगाव महापालिका निवडणुकीत भाजपला एकही जागा जिंकण्यात यश आले नव्हते. यंदा भाजपने ८४ जागा असलेल्या महापालिकेतील ५६ जागांपैकी २७ जागांवर मुस्लिम उमेदवार दिले आहेत. मालेगावमधील बहुसंख्य मुस्लिम महिला बुरखा परिधान करतात. यासोबतच या ठिकाणी राहणाऱ्या मुस्लिम जनतेचे गोमांस हेच प्रमुख अन्न आहे. त्यामुळेच या भागातील भाजपच्या बहुतांश उमेदवारांनी पक्षाची गोमांस बंदीची भूमिका गुंडाळून ठेवली आहे. उलट सत्तेत आल्यास गोमांस बंदी उठवू, असे आश्वासने येथील भाजपचे उमेदवार देत आहेत.