पालिका निवडणुकीत निम्मे उमेदवार मुस्लीम; अल्पसंख्याक महिलांच्या पाठिंब्यावर भर

मुस्लीमबहुल मालेगावात बुधवारी होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी भाजपने तब्बल २७ मुस्लिमांना उमेदवारी दिली आहे. अलीकडेच पार पडलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत एकाही मुस्लिमाला उमेदवारी न देणाऱ्या भाजपने मालेगावात हे औदार्य कसे दाखवले, हा प्रश्न यानिमित्ताने कोणालाही पडू शकतो. परंतु भाजपने दिलेले हे सर्व मुस्लीम उमेदवार मुस्लीमबहुल भागातील असल्याचे लक्षात घेतले की हे करण्यामागे केवळ राजकीय पोळी भाजून घेणे हाच या पक्षाचा हेतू असल्याचे अधोरेखित होते. सद्य:स्थितीत तिहेरी तलाकच्या मुद्दय़ावरून मुस्लीम महिलांचा भाजपकडे वाढणारा कल लक्षात घेता या निवडणुकीत भाजपच्या मुस्लीम उमेदवारांनी थोडेबहुत यश मिळविले किंवा त्यांनी नुसत्या चांगल्या लढती जरी दिल्या तरी मुस्लीम समाज भाजपकडे वळू लागल्याचा संदेश अन्यत्र देणे सुलभ होईल, असा भाजपचा त्यामागे हेतू दिसतो. तिहेरी तलाकच्या निमित्ताने रुजविण्यात आलेल्या या ‘मालेगाव पॅटर्न’चा भाजपला आगामी काळात देशात व राज्यात होणाऱ्या विविध निवडणुकांमध्ये लाभ होईल, अशी खूणगाठ बांधून हा पॅटर्न यशस्वी करण्यासाठी भाजपने कंबर कसल्याचे दिसून येते.

भौगोलिकदृष्टय़ा मालेगाव हे शहर दोन भागांत विभागले गेले आहे. शहरातून जाणाऱ्या मोसम नदीच्या पूर्व भागात मुस्लीमबहुल आणि पश्चिम भागात हिंदूबहुल वस्ती आहे. देशभरात मुस्लीम समाज हा अल्पसंख्याक म्हणून ओळखला जात असला तरी मालेगावात ७० टक्के लोकसंख्या असलेला हा समाज बहुसंख्याक, तर ३० टक्के लोकसंख्या असलेला हिंदू समाज हा अल्पसंख्याक ठरतो. साहजिकच स्थानिक राजकारणात मुस्लीम समाजाचे अधिक प्राबल्य आहे. आता होत असलेल्या महापालिका निवडणुकीत साठवर जागा असलेल्या मुस्लीमबहुल भागात राष्ट्रवादी काँग्रेस-जनता दल युती, काँग्रेस व एमआयएम हे प्रमुख पक्ष रिंगणात आहेत. तर जवळपास २० जागा असलेल्या हिंदूबहुल भागात भाजप व शिवसेना या दोन प्रमुख पक्षांनी परस्परांसमोर आव्हान उभे केले आहे. महापालिकेच्या एकूण ८४ जागांपैकी एका जागेवर काँग्रेस उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने आता ८३ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. सर्व जागांवर एकाही पक्षाला उमेदवारी देणे शक्य झाले नसले तरी सर्वाधिक ७३ ठिकाणी उमेदवार उभे करून काँग्रेसने आघाडी घेतली आहे. त्याखालोखाल भाजपने ५६ ठिकाणी उमेदवार देऊन सर्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. राष्ट्रवादीने ५२, शिवसेनेने २६, एमआयएमने ३५ ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत.

सध्या मुस्लीम समाजातील तिहेरी तलाकवरून देशभर वातावरण तापले आहे. या तलाक पद्धतीला भाजपचा विरोध असल्याने काही मुस्लीम सुधारणावादी मंडळी तसेच मुस्लीम महिलांचा भाजपकडे कल वाढू लागला आहे. या बदलत्या प्रवाहाचा राजकीय लाभ उठविणे व तो प्रवाह लोकांमध्ये अधिक प्रमाणात बिंबवण्याचा भाजपचा प्रयत्न दिसून येत आहे.

या प्रयत्नांचा भाग म्हणूनच मुस्लिमांना भाजपने अधिक प्रमाणात या वेळी उमेदवारी दिल्याचे मानले जात आहे. त्यात हे उमेदवार कितपत यशस्वी होतात व किती मते घेतात याविषयी दोन्ही बाजूंनी वेगवेगळे तर्क लढविले जात असले तरी भाजपमध्ये मोठय़ा अपेक्षा निर्माण झाल्या आहेत. यापूर्वी झालेल्या विविध निवडणुकांमध्ये मुस्लीमबहुल भागात भाजप किंवा सेनेतर्फे लढलेल्या मुस्लीम उमेदवारांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचीही मते मिळू शकली नव्हती, हा कटू परंतु सत्य अनुभव पाठीशी असला तरी आता तशी परिस्थिती नसल्याचा आशावाद या पक्षातील काही जण व्यक्त करीत आहेत.

अशा वेळी भाजपचे मुस्लीम उमेदवार विजयी झाले तर उत्तमच, परंतु निदान त्यांनी चांगली लढत दिली तरी हा समाज आपल्याकडे आकृष्ट होत असल्याचा संदेश जाऊ शकतो व त्यातून राजकीय लाभही उठवता येईल, असे समजून भाजपची मंडळी कामाला लागल्याचे दिसून येते. या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर भाजप अल्पसंख्याक आघाडीच्या राष्ट्रीय महामंत्री डॉ. नाहिद शेख, प्रदेशाध्यक्ष जमाल सिद्दिकी, लातूरचे माजी महापौर अखत मिस्तरी अशा भाजपमधील बडय़ा मुस्लीम नेत्यांनी शहरात येऊन प्रचारसभा व बैठका घेतल्या. तसेच या नेत्यांनी समाजातील काही बडय़ा व्यक्तींची भेट घेऊन अन्य पक्षांपेक्षा भाजप कसा उत्तम पक्ष आहे आणि पंतप्रधानांचे ‘सबका साथ, सबका विकास’ हे धोरण कसे सर्वव्यापी आहे, हे गळी उतरविण्याचे प्रयत्न केले. एकुणात मुस्लिमांना आपलेसे करणारा भाजपचा हा ‘मालेगाव पॅटर्न’ चांगलाच गाजला असला तरी तो किती यशस्वी होतो हे बघणे मात्र रंजक ठरणार आहे.

बदलत्या प्रवाहाचा लाभ उठविण्याचा प्रयत्न

गेल्या निवडणुकीत अकरा जागा जिंकणाऱ्या शिवसेनेने या वेळी २६ ठिकाणी उमेदवार उभे केले असून, गेल्या वेळी एकही जागा न जिंकणाऱ्या भाजपने तब्बल ५६ ठिकाणी उमेदवार दिले आहेत. तसेच सेनेने जेथे केवळ दोन मुस्लिमांना उमेदवारी दिली, तेथे भाजपच्या ५६ उमेदवारांमध्ये २७ उमेदवार मुस्लीम असून त्यात निम्म्याहून अधिक महिला आहेत. अर्थात, हे सर्व २७ उमेदवार मुस्लीमबहुल भागातील असले तरी प्रथमच एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर मुस्लीम उमेदवार उभे करण्यामागे भाजपचे काही गणित असल्याचे लपून राहिलेले नाही. सध्या मुस्लीम समाजातील तिहेरी तलाकवरून देशभर वातावरण तापले आहे. या तलाक पद्धतीला भाजपचा विरोध असल्याने काही मुस्लीम सुधारणावादी मंडळी तसेच मुस्लीम महिलांचा भाजपकडे कल वाढू लागला आहे. या बदलत्या प्रवाहाचा राजकीय लाभ उठविणे व तो प्रवाह लोकांमध्ये अधिक प्रमाणात बिंबवण्याचा भाजपचा प्रयत्न दिसून येत आहे.