गोमांसबंदी उठवण्यासंबंधी मी कोणतेही विधान केले नसून माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचे स्पष्टीकरण मालेगावमधील भाजप उमेदवार शेख अख्तर यांनी दिले आहे. तिहेरी तलाकसंदर्भात भाजपची जी भूमिका आहे तीच भूमिका माझीदेखील आहे असे त्यांनी म्हटले आहे.

मालेगावमधील भाजप उमेदवार शेख अख्तर यांच्या गोमांसबंदीसंदर्भातील विधानाने वाद निर्माण झाला होता. देशभरात भाजपने गोमांस सेवन, गोहत्या आणि तिहेरी तलाकचा विरोध दर्शवला आहे. पण मालेगावमधील प्रचारात शेख अख्तर यांनी गोहत्या बंदी उठवण्याचे आणि तिहेरी तलाकचे समर्थन केल्याचे वृत्त प्रसारित झाले होते. शेख अख्तर यांनी मंगळवारी संध्याकाळी या वृत्तावर स्पष्टीकरण दिले आहे.

मी मुस्लिमांना मते द्या, गोमांस बंदी उठवतो असे विधान केलेले नाही, माझ्या विधानाचा विपर्यास केला असे त्यांनी सांगितले. तिहेरी तलाक हा धार्मिक मुद्दा आहे, तो निवडणुकीचा मुद्दा नाही. याबाबत पक्षाची जी भूमिका आहे तीच माझी भूमिका आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. शेख अख्तर मालेगावमधील प्रभाग क्रमांग २१ मधील भाजपचे उमेदवार आहेत.