भ्रष्टाचार निर्मूलन ही सर्वच पक्षांची भूमिका आहे, परंतु बोंबाबोंब करणाऱ्या भाजपमध्येच भ्रष्टाचाराची गंगोत्री आहे, नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये लोकायुक्त नियुक्त केला असता तर आज मोदींचाही ‘येडीयुरप्पा’ झालेला दिसला असता, ते जेलमध्ये दिसले असते, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नबाब मलिक यांनी केली.
मलिक यांनी पक्षाचे उमेदवार राजीव राजळे यांच्या प्रचारासाठी नगर शहरासह भिंगार व जामखेड तालुक्यात मेळावे घेतले. आज सकाळी ते राजळे यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना त्यांनी मोदींवर टीका केली. मोदींच्या प्रभावाची लाट ही वरवरची आहे, मोदीविरोधी त्सुनामी आतून वाहते आहे, ती निकालानंतरच समजेल, असे मलिक म्हणाले. पक्षाचे दुसरे प्रवक्ते अंकुश काकडे, किसनराव लोटके, अनंत देसाई आदी या वेळी उपस्थित होते.
राज्यात काँग्रेस आघाडीला ३५ ते ३८ जागा मिळतील, त्यामध्ये राष्ट्रवादीला १२ ते १५ जागा मिळतील, असा दावा मलिक यांनी केला. पुढील विधानसभा निवडणुकीतही काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्रच आघाडी करून निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शरद पवार पुढील निवडणुकीत काँग्रेसबरोबर राहतील का, या प्रश्नावर त्यांनी हा केवळ मीडियाचा दावा असल्याचा आक्षेप घेतला. राज्यात आघाडीची चांगली एकजूट असल्याच्या दाव्यावर मलिक यांचे नगरसह कोकणात गोंधळ असल्याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले, नगरमध्ये कोणतेही वेगळे चित्र नाही, सिंधुदुर्गमध्ये राष्ट्रवादीचे आमदार केसरकर व पालकमंत्री नारायण राणे यांच्यातील वाद उद्या संपलेला असेल.
दुष्काळात गुजरातने दिलेल्या पशुखाद्याच्या मदतीच्या मुद्यावर मलिक म्हणाले की, दिलेले दान परत मागणारी भाजपची संस्कृती आहे, त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. पवार यांनी केंद्रीयमंत्री म्हणून एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटण्यात चुकीचे काही नाही, उद्या मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चव्हाण यांनी गव्हाचे सर्वाधिक उत्पादन केले तर सत्य बोलणे म्हणजे प्रशंसा ठरत नाही.
ठाकरे बंधूंमध्ये भाजपमुळेच वाद
भाजपने महाराष्ट्रात घाणेरडे राजकारण सुरू केले आहे. शिवसेनेबरोबर युती असताना आतून मनसेचा भिडू तयार केला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर सेना कमकुवत झाल्याने त्यांना वगळून रीतसर मनसेशी हातमिळवणी सुरू केली आहे. मुंबईत मनसेचे तीन आमदार असतानाही तेथे मनसेने भाजपविरुद्ध उमेदवार उभा केला नाही. भाजपमुळेच दोन्ही ठाकरे बंधू एकमेकांविरुद्ध आरोप करू लागले आहेत. ही परिस्थिती चिघळत असल्याने जेथे सेना व मनसेमध्ये थेट लढती होत आहेत, अशी ठिकाणे अतिसेवंदनशील म्हणून जाहीर करावीत व तेथे अधिक बंदोबस्त तैनात करावा, अशी मागणी राष्ट्रवादीने निवडणूक आयोगाकडे केली असल्याचे मलिक यांनी सांगितले.