विक्रमगडहून मोखाडय़ाकडे जाताना शेतातले खुंट पिकलेल्या भातपिकाची कापणी झाल्याचे सांगत आहेत. पावसाळ्यात शेतीचा हिरवा व नंतर पिवळा रंग ल्यायलेल्या पालघर जिल्ह्य़ात आता उन्हात करपलेल्या गवताचा लालसर रंग पसरलाय. सामाजिक व्यवस्था व सरकार नावाची गोष्ट अस्तित्वात असल्याबद्दल साशंक असलेल्या आदिवासींचे आयुष्यही पुढे सरकलेय. तीन महिन्यांपूर्वी मुलीच्या मृत्यूनंतर हतबल झालेली आणि त्याच रागात आदिवासी विकासमंत्र्यांना हाकलून लावलेल्या रोशनी सवराच्या आईच्या चेहऱ्यावर नुकत्याच जन्मलेल्या मुलामुळे हसू उमलले आहे. मोखाडय़ात सागर वाघची आई, लहान मुलगी व सासूबरोबर मागे राहिलीय आणि घरातील बाकी सर्व मंडळी दगडखाणीवर सहा महिन्यांसाठी कामाला गेली आहेत. सागरचा कुपोषित चुलतभाऊही त्यांच्यासोबत आहे. वीटभट्टीवर कामाला जाणार असलेले ईश्वर सवराचे आईवडील मात्र मळणीचे काम शिल्लक असल्याने घरीच राहिलेत. त्यामुळे ईश्वरच्या बहिणीची  शाळा अजून तरी सुटली नाहीये. या सगळ्यांच्या आयुष्यात सरकारी व्यवस्थेने कोणताही बदल केलेला नाही. बदल केलाय तो फक्त काळाने.

वाडा तालुक्यात अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या पेटरांजणीत रोशनी सवरा या मुलीचा ९ सप्टेंबर रोजी कुपोषणाने मृत्यू झाला तेव्हा तिची आई सात महिन्यांची गर्भवती होती. मुलीच्या मृत्यूनंतर त्यांच्या चेहऱ्यावरील हसू मावळले होते. आता झोपडीबाहेर लावलेल्या चादरीच्या पाळण्यातील हसणारे बाळ स्वत:हून दाखवताना त्यांचा चेहरा आनंदला होता. ४ नोव्हेंबर रोजी जन्मलेल्या या मुलाचे नाव ‘रोशन’ ठेवलेय, असे त्याच्या वडिलांनी, गुरुनाथ सवरा यांनी सांगितले. रोशनी गेल्यावर वातावरण तापलेले असल्याने तिच्या आईची प्रसूतीपूर्व काळजी घेण्याबाबत सुरुवातीला हालचाल झाली, पौष्टिक खाणे घरी आणून दिले गेले, मात्र महिन्याभरातच सरकारी जोश मावळला. अंगणवाडीसेविकेचा आणि रुग्णालयाचा निधीही संपल्याने सोनोग्राफीचेही ६०० रुपये भरावे लागले. ते परत मिळण्याची आशाही आता मावळू लागली आहे. अंगणवाडीत मात्र रोज खिचडी मिळते. गेल्या महिन्यात रोज अंडे व केळे मिळायचे, आता एक दिवसाआड मिळू लागले आहे, असे ‘रोशन’च्या आईने सांगितले. घराची अवस्था मात्र दयनीय आहे.सरकारकडून ग्रामपंचायतीच्या निधीतून घर बांधण्यासाठी गुरुनाथ सवरा मागे राहिले असले ग्रामसेवकांच्या संपामुळे सर्व काम जैसे थे आहे.  त्याच वेळी गुरुनाथ सवरांचा भाऊ त्याच्या बायको मुलांसह जुवा येथे वीटभट्टीच्या कामावर निघून गेला आहे.

कुपोषित मुलासह दगडखाणीच्या कामावर

मोखाडय़ात कळमवाडीत सागर वाघच्या घरी गेलो तेव्हा त्याची आजी मातीच्या चंद्रमौळी घरात कामात व्यग्र होती. सागरची आई तिच्या दहा महिन्यांच्या लेकीला घेऊन तालुक्याच्या बाजारात गेली होती. २८ ऑगस्टला सागरचा मृत्यू झाल्यावर त्याची वीस-बावीस वर्षांची आई हादरली होती. मात्र तीन महिन्यांत सरकारी आश्वासनांशिवाय बाकी काहीच मिळालेले नसल्याने आणि भेटीला आलेल्या महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी दिलेले मदतीचे आश्वासनही पोकळ ठरल्याने आता त्या नेहमीच्या कामाला लागल्या आहेत. मुलगी लहान असल्याने सासूबाईंसोबत पुढील सहा महिने घर सांभाळण्याची जबाबदारी देऊन त्यांचा नवरा दोन भाऊ, वहिनी, बहीण यांच्यासह कुडूस येथे दगडखाणीत कामाला गेला आहे. महत्त्वाचे म्हणजे सागरचा दोन वर्षांचा चुलतभाऊ कुपोषित आहे.

खोचमध्येच कुपोषणाने मृत्यू पावलेल्या ईश्वर सवरा याच्या घरी मात्र कडी लावली होती. शेजारी चौकशी केली तेव्हा त्याची आई दुसऱ्या पाडय़ावर कोणा नातेवाईकाकडे गेल्याचे समजले. नाशिकला खडी फोडण्याच्या कामासाठी जाण्यासाठी गेल्या महिन्यात त्यांच्या घरी तयारी सुरू होती. मात्र शेतीची मळणीची कामे शिल्लक असल्याने ईश्वरच्या वडिलांना सध्या रोजगार मिळाला आहे. त्यामुळे त्यांच्या चौथीत शिकणाऱ्या मुलीची, सोनाली सवराची शाळा आणखी काही दिवस सुटणार नाही. खोच येथे रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली होती, मात्र कामगार मिळत नसल्याने गेले १५ दिवस हे काम बंद आहे. अध्रेअधिक गाव वीटभट्टी व दगडखाणीवर गेल्याने ही स्थिती झालीय. एकीकडे काम नाही म्हणून स्थलांतर आणि दुसरीकडे कामगार नसंघर्ष थांबल्याने बिबटय़ांत वाढाही म्हणून रोजगार हमी योजनेचे काम बंद या फेऱ्यात गाव अडकलाय.

संपाचा फटका

कामाचा बोजा कमी करावा आणि मानधन वाढवावे, अशा प्रमुख मागण्यांसाठी आधी पालघर जिल्ह्य़ातील तलाठी व नंतर ग्रामसेवकांनी संप पुकारला. वीस दिवसांच्या आंदोलनानंतर तलाठी रुजू झाले असले तरी ग्रामसेवक मात्र संपावरच आहेत. त्यामुळे ग्रामस्थांची अनेक कामे रखडली आहेत. गुरुनाथ सवरा यांना ग्रामपंचायतीतून घर मंजूर झाले होते. यावर्षी घर बांधायचे म्हणून त्यांनी वीटभट्टीवर जाण्याचे टाळले, मात्र ग्रामसेवकांच्या संपात त्यांचे घराचे स्वप्न लांबणीवर पडले आहे.