भारतीय रेल्वेत मालवणी/कोकणी पद्धतीचे जेवण उपलब्ध करून देणाऱ्या ‘फुड अ‍ॅण्ड  ट्रॅक’ अशा योजनेचा शुभारंभ रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते नुकताच झाला. सावंतवाडी रेल्वे रोड स्थानकावर झालेल्या या शुभारंभात महिला बचत गटांना आर्थिक सवलत मिळवून देणाऱ्या या उपक्रमाला यश आल्यास कोकण जगभर पोहचेल. बॅ. नाथ पै, अ. ब. वालावलकरांच्या संकल्पनेतील कोकण रेल्वेचे स्वप्न प्रत्यक्षात साकारणाऱ्या प्रा. मधु दंडवते व जॉर्ज फर्नाडिस यांच्या कल्पनेला आर्थिक प्रगतीचा कळस चढविणारे सिंधुदुर्गचे सुपुत्र रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या बचत गटांच्या कल्पनेला खऱ्या अर्थाने आर्थिक उन्नती साधण्याचा मार्ग मोकळा झाला.  कोकण रेल्वे सुरू झाल्यानंतर कोकणात रोजगार निर्माण होईल अशा अपेक्षा होत्या. कोकणचा कायापालट करणारे प्रकल्प येतील असे बोलले जात होते. बांधकाम प्रकल्प कोकणात मोठय़ा प्रमाणात आले तसेच प्रदूषणकारी प्रकल्पांची चर्चाही झाली.

कोकण रेल्वे सुरू झाली, पण भारतीय रेल्वेने कायमच कोकण रेल्वे कॉर्पोरेशनला दुर्लक्षित केले. सिंधुदुर्गचे सुपुत्र सुरेश प्रभू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात स्थान निर्माण करू शकले. त्यांना रेल्वेमंत्रीपद मिळाल्यानंतर कोकण रेल्वेत पायाभूत सुविधा निर्माण करून दर्जा दिला. भारतीय रेल्वेत कोकण रेल्वेला दर्जा निर्माण करण्याचे खऱ्या अर्थाने सुरेश प्रभू यांनी स्वप्न साकार केले.

सुरेश प्रभू राजापूर लोकसभा मतदार संघाचे अनेक वर्षे खासदार राहिले असल्याने त्यांना रेल्वेच्या समस्या, रेल्वे थांब्याच्या मागण्यांची कल्पना होती. त्याची पूर्तता पायाभूत सुविधा निर्माण करण्यात त्यांना यश आले. महिला बचत गटांची कल्पनादेखील सुरेश प्रभू यांची होती. त्यांनी खासदार असताना बचत गट निर्माण केले. त्यानंतर बचत गटांची चळवळ उभी राहिली. भारतीय रेल्वेत कॅटरिंग व्यपस्थापनेकडून भोजन पुरविण्यात येते. त्या भोजन व खाद्यपदार्थाबाबत कायमच विविध चर्चा होत असतानाच रेल्वेमंत्री प्रभू यांनी आयआरसीटीसीकडून महिला बचत गटांना भोजन, खाद्यपदार्थ बनवून देणाऱ्या योजनेचा पाया घातला, त्याला ३ डिसेंबर रोजी प्रत्यक्षात शुभारंभाने मूर्तस्वरूप दिले.

रेल्वेतील प्रवाशांना कोंबडी वडय़ापासून सुक्या मेव्यापर्यंत सर्व मालवणी, कोकणी पदार्थाची चव चाखायला मिळणार आहे. रेल्वेत बसण्यापूर्वी ऑर्डर दिल्यास रेल्वेत बसल्या-बसल्या ताजे जेवण, पदार्थ आरक्षित सीटवर उपलब्ध करून देण्याची योजना आयआरसीटीसीने उपलब्ध करून दिली आहे. या पदार्थाची ऑर्डर प्रवासी थेट मोबाइलच्या माध्यमातून देऊ शकतात. त्यासाठी ऑनलाइन सेवा फायदेशीर ठरणार आहे. महिला सक्षमीकरणाला प्रेरणा देणारी नाबार्ड संस्था या सेवेला अर्थपुरवठा करत आहे. रेल्वेची आयआरसीटीसी ही प्रवाशांना खाद्य पदार्थापासूनच्या सेवा पुरवणारी संस्था, महिला आर्थिक विकास महामंडळ महाराष्ट्र व लुपिन फाउंडेशन या संस्थाही उपक्रमात साहाय्य करीत आहे.

सावंतवाडी रोड (मळगाव) रेल्वे स्थानक परिसरात सर्व सुविधांनी युक्त असे स्वयंपाकगृह बनविण्यात आले आहे. महिला बचत गटांनी एकत्रित येऊन निर्माण केलेली ‘माहेर लोक संचालित साधन केंद्र’ या नावाची संस्था निर्माण केली आहे; ही बचत गटांची संस्था स्वयंपाकघर चालवीत आहे. या स्वयंपाकघराच्या उभारणीसाठी नाबार्डने सव्वासहा लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या बचत गटांच्या महिला प्रवाशांसाठी त्यांच्या मागणीनुसार कोंबडी वडे, कोथंबीर वडी, आंबोळी चटणी, घावणे चटणी, सुरमई थाळी, सुके चिकन भाकरी, उकडीचे मोदक, सोलकढी असे मालवणी भोजन, पदार्थ उपलब्ध करून देणार आहेत. त्यासाठीच्या ऑनलाइन ऑर्डर्स स्वीकारण्याचे प्रशिक्षणही या महिलांना देण्यात आले आहे.

रेल्वे प्रवाशांना नाश्ता व भोजन उपलब्ध करून देतानाच फणसपोळी, आंबापोळी, कोकण सरबत, आवळा सरबत, काजुगर यांसारखा कोकणी मेवाही या बचतगटांच्या माध्यमातून प्रवाशांना मिळणार आहे. कोकण रेल्वे प्रवाशांना सुरुवातीला उपलब्ध होणारी ही सेवा भारतीय रेल्वेतही टप्प्याटप्प्याने उपलब्ध करण्याचा विचार रेल्वेमंत्री प्रभू यांनी बोलून दाखविला. आयआरसीटीसीचे अध्यक्ष डॉ. ए. के. मनोचा यांनी सेवांचे विस्तारीकरण करण्याबाबतही सूतोवाच केले. कोकण रेल्वेमुळे आर्थिक विकास होणार असल्याची चर्चा होती. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी महिला बचत गटांसाठी निर्माण केलेली ही आर्थिक उन्नती साधणारी ई-कॅटरिंग सुविधा यशस्वी झाली तर आर्थिक क्रांतीचे पर्व कोकणातून अर्थातच सिंधुदुर्गातून सुरू झाल्याचे चित्र देशासमोर एक मॉडेल म्हणून उभे राहील. याचे खऱ्या अर्थाने श्रेय सुरेश प्रभूंना दिले जाईल. रेल्वे प्रवाशांना   www.ecatering.irctc.co.in तसेच  SMS to 139/mel<space>PNR no व डाऊनलोज मोबाईल अ‍ॅप ”food on Track वर ऑर्डर्स देता येईल. शिवाय १३२३ वर कॉलदेखील करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.