७०० शेतक ऱ्यांना सिंचनाचा लाभ मिळणार

तीव्र उन्हामुळे पाण्याअभावी कोरडा ठणठणीत असलेल्या भामरागड तालुक्यातील जिंजगाव येथील ‘मामा’ तलावाच्या खोलीकरणाचे काम लोक बिरादरी प्रकल्पाने सुरू केले आहे. यामुळे थेट ७०० शेतकऱ्यांच्या शेतीला सिंचनाचा लाभ मिळणार आहे.

अतिदुर्गम भामरागड या नक्षलग्रस्त तालुक्याच्या ठिकाणापासून २५  किलोमीटर अंतरावर जिंजगाव हे ६५० लोकवस्तीचे आव आहे. ताडगावपासून १५ किलोमीटरचा रस्ता पूर्णपणे उखडून गेला आहे. त्यामुळे २५ किलोमीटरचे अंतर जायला दीड तास लागतो. पल्ली ग्राम पंचायतमध्ये हे गाव मोडते. त्या भागात नक्षलवाद्यांच्या दहशतीमुळे सरपंच व्यवस्था अस्तित्वात नाही. प्रशासक आहे. जिंजगावमधील रस्ते पावसाळय़ात  चिखलग्रस्त असतात. खरे तर ग्रामपंचायतमार्फत सिमेंट रोड आणि गटार बांधकाम करणे शक्य आहे. पण याला प्रशासक आणि प्रशासन यांची उदासीनता कारणीभूत आहे. त्यामुळेच मामा तलावात प्रचंड गाळ साचलेला असतांना आणि तलाव पूर्णत: कोरडा पडलेला असतांना तिथे खोलीकरणाचे काम हाती घेतले नाही. त्याचा परिणाम या भागातील शेतकऱ्यांची शेती सिंचनापासून वंचित राहण्याची भीती आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन लोकबिरादरी प्रकल्पाचे डॉ. अनिकेत आमटे व सहकाऱ्यांनी पुढाकार घेऊन जिंजगाव येथील मामा तलावाच्या खोलीकरणाचे काम हाती घेतले आहे. या खोलीकरणाच्या कामात दोन जेसीबी मशीन आणि १२ ट्रॅक्टर लावण्यात आलेले आहेत. तलावाच्या खोलीकरणानंतर त्यात पावसाचे पाणी साचले की गावातील ७०० शेतकऱ्यांना शेतीसाठी सिंचनाची व्यवस्था होणार आहे. विशेष म्हणजे याच मामा तलावातील पाण्यावर शेतकरी वर्षांतून दोन ते तीन पिके घेऊ शकतील आणि सक्षम होतील.

हे गाव आदर्श करण्यासाठी अनिकेत आमटे यांनी या गावात विविध कामांना सुरुवात केलेली आहे. विशेष म्हणजे या गावाच्या आजूबाजूला १६ ते १७ शेततळी करून घेतली आहेत. या मामा तलावातील पाण्याने लगतची सर्व शेततळी छोटय़ा कालव्याने भरण्याचा मानस आहे. लोकसहभागातून कालव्याचे काम सुरू आहे. रोजगार हमी योजनेमधूनही कामे सुरू आहेत. पण पैसे वेळेवर मिळत नाही याची खंत त्या गावातील लोकांनी व्यक्त केली. प्रत्येक घरात नळाने पाणी देण्यासाठी कूपनलिका करून मोठय़ा टाकीवर पाणी चढवायची योजना तीन वर्षांंपूर्वी पूर्ण झाली. पण एकही दिवस तो पाण्याचा पंप चालत नाही. तो पंप आणि तुटलेली जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. पाण्यासारख्या जीवनावश्यक गोष्टींची प्रशासनामार्फत दखल घेतली जात नाही हे दुर्दैव असल्यामुळेच या गावात लोकबिरादरी प्रकल्पाने स्वत: मामा तलाव खोलीकरणाचे काम हाती घेतले आहे.