स्वस्तात घरे देण्याच्या नावाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या कामगार युनियनचा सेक्रेटरी आहे असे सांगून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या एका भामटय़ाला पोलिसांनी आज अटक केली. त्याला न्यायालयाने २८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
वसंत पवार (राहणार, दर्शन पॅलेस, गुलमोहोर रस्ता, नगर) असे या भामटय़ाचे नाव आहे. मूळचा अकोले तालुक्यातील पवार गेली अनेक वर्षे जिल्ह्य़ाच्या राजकीय वर्तुळात वावरत आहे. बऱ्याच पुढाऱ्यांच्या निकटचा माणूस अशी ओळख त्याने तयार केली होती. गेली काही वर्षे त्याने नगर शहरात बस्तान बसवले होते. नगरमध्येही राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक पुढाऱ्यांचा निकटवर्ती म्हणून त्याने प्रसिद्धी मिळवली होती. धनलक्ष्मी अशा नावाच्या पतसंस्थेशीही तो संबंधित आहे. त्याच माध्यमातून त्याने गेली काही वर्षे ही फसवणूक चालवली होती, असे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.
काही जणांनी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांकडे तक्रार केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यांच्यातीलच एकाने पालकमंत्री बबनराव पाचपुते यांच्या सांगण्यावरून तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या ठाण्यात नुकतेच रूजू झालेले सहायक पोलीस निरीक्षक राहुलकुमार पाटील यांनी फिर्याद दाखल झाल्यानंतर लगेचच स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्याला त्याच्या नव्हे तर नगरमधील एका दुसऱ्याच घरात सकाळी १० वाजताच गाठले व ताब्यात घेतले. दुपारी न्यायालयात नेले असता त्याला २८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला.
निवडणूक चिन्हाचा वापर
पोलीस चौकशीत पवार याने नगर शहरातच नव्हे, तर जिल्ह्य़ातीलही काहीजणांकडून स्वस्तात घर बांधून देण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची योजना आहे असे सांगून फसवणूक केली असल्याचे निदर्शनास आले. त्याच्याजवळून काही प्रचारपत्रके तसेच पावतीपुस्तके जप्त करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस कामगार जनरल युनियन अशा नावाने छापलेल्या पावतीवर राष्ट्रवादीचे घडय़ाळ हे निवडणूक चिन्ह तर आहेच, शिवाय माजी मंत्री गोविंदराव आदिक यांच्यापासून राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांची नावेही आहेत. शहर व जिल्ह्य़ातील अनेकांना त्याने हे आमिष दाखवून पैसे जमा केले असल्याचे उघडकीस येत आहे. काहीजणांना संशय आल्याने त्यांनी पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांकडे तक्रार केली.
तीन लाख रूपयात घर देण्याची योजना आहे असे सांगून तो सुरूवातीला ११ हजार ५०० रूपये व सभासद शुल्क म्हणून ५०० रूपये उकळायचा. त्याची रितसर पावती वगैरे देत असल्याने व पावतीवर राष्ट्रवादी काँग्रेस जनरल कामगार युनियन असे नाव, नेत्यांची नावे असल्याने पैसे देणाऱ्यांचा विश्वासही बसायचा.  
अंदाजे एक हजार लोकांकडून त्याने असे पेसे उकळल्याचा अंदाज व्यक्त होते. सभासदांची बैठक झाल्यावर बँकेकडून ६ लाख रूपयांचे कर्ज व ३ लाख रूपयांची सबसिडी मिळणार आहे असे तो सांगत असे.  
पक्षाची अशी काही योजना वगैरे नसल्याने ज्यांच्याकडे तक्रार करण्यात आली त्यांनी लगेचच वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधला व पवारची ही बनवेगिरी उघडकीस आली. पोलीस आता त्याने कितीजणांना फसवले आहे त्याची चौकशी करत आहेत, असे तपासी अधिकारी राहुलकुमार पाटील यांनी सांगितले.