जळगाव जिल्ह्यातील पाटणादेवी येथील धबधब्याजवळ असलेल्या कुंडाजवळ सेल्फी काढत असताना पाय घसरून पडल्याने एका तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. योगेश्वर राजेश्वर भोरे (वय २३) असे या मयत तरुणाचे नाव असून तो नांदेड जिल्ह्यातील कुंडलवाडी येथील रहिवासी होता. पाटणादेवी परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने तेथील धबधबा ओसंडून वाहत आहे. हा धबधबा पाहाण्यासाठी याठिकाणी पर्यटकांची मोठ्याप्रमाणात गर्दी होवू लागली आहे. हा तरुण देखील त्याच्या काही मित्रांसह याठिकाणी आला होता. सर्व मित्र आंघोळीसाठी पाटणादेवी येथील धबधब्याजवळील कुंडाजवळ आले. या ठिकाणी सेल्फी काढत असताना योगेश्वर भोरे याचा तोल गेल्याने पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील अमोल चौधरी घटनास्थळी दाखल झाले. पोलीस आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांंनी शोध घेत त्याचा मृतदेह पाण्याबाहेर काढला.