राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना सोळाव्या लोकसभेमध्ये राष्ट्रीय काँग्रेस सत्ता स्थापन करू शकणार नाही याची पुसटशी खात्री झाल्यामुळे त्यांच्या एकूण वर्तनात आणि बोलण्यामध्ये फरक पडला आहे. तिस-या आघाडीच्या पर्यायाला त्यांनी दिलेल्या दुजो-यामुळे पवार हे केवळ कुंपणावरचे राजकारण करतात असे नाही तर विश्वासघाताचेच राजकारण करतात. त्यांचे विधान हा याचाच पुरावा आहे असा आरोप खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी पत्रकाव्दारे केला आहे.
 केंद्र शासनातील संयुक्त पुरोगामी आघाडीला सरकार स्थापन करण्याइतके संख्याबळ मिळाले नाही, तर आम्ही तिस-या आघाडीचा पर्याय निवडू अशा पद्धतीचे विधान पवार यांनी केले आहे. त्यावर खासदार मंडलिक यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मंडलिक म्हणाले, कोल्हापूर लोकसभेची जागा ही नैसर्गिक नियमानुसार काँग्रेसच्या वाटय़ाला असताना पवार यांनी ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटय़ाला मिळावी म्हणून मनात खुनशी प्रवृत्ती ठेवून ओरबाडून घेतली. गेल्या दहा वर्षांत काँग्रेसला पश्चिम महाराष्ट्रात सक्षम नेतृत्व नसल्याने काँग्रेसलाही राष्ट्रवादीसमोर कोल्हापूरच्या जागेसाठी नमते घ्यावे लागले. चुकीच्या उमेदवारास उमेदवारी द्यावी लागल्याचे विदारक चित्र आहे. गेली २०-२५ वर्षे पवार हे केंद्रात विविध पदांचा कारभार पाहात आहेत. मात्र त्यांचा डोळा हा प्रामुख्याने पंतप्रधानपदावर होता आणि आहे. ही वस्तुस्थिती पवार यांच्या डोळ्यासमोर कायम असल्याने त्यांची आजची अशा प्रकारची भाषा पुढे येत आहे.