माणगाव सत्र न्यायालयाचा निर्णय

मारहाण केल्याप्रकरणी अशोक महादेव केदारी व जनार्दन महादेव केदारी यांना पाली येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी ठोठावलेली  सक्तमजुरीची शिक्षा माणगाव येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने कायम केली. या प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी आहे की, पाली तालुक्यातील उदधरवाडी ोथे राहणारे अशोक केदारी व जनार्दन केदारी यांची गुरे अक्षता खंडागळे  यांच्या परसबागेत गेली होती. ती अक्षता यांनी बाहेर काढली. या कारणावरून २० जुल २००४ रोजी सकाळी १०-३० वाजताच्या सुमारास आरोपींनी फिर्यादीस शिवीगाळ करून आरोपी अशोक केदारी, जनार्दन  केदारी यांनी अक्षता व तिची आई यांना संगनमताने काठीने व हाताने घराच्या अंगणात मारहाण केली.  या घटनेबाबत पाली पोलीस स्टेशनला तक्रार देण्याकरिता गेली असता आरोपींनी अक्षता यांच्या घरात घुसून वडील शरद देशमुख यांना लोखंडी हत्याराने डोक्यावर मारून दुखापत केली होती.

याप्रकरणी पाली पोलीस ठाण्यात गुन्हा झाला होता. त्यावरून दाखल  करण्यात आलेल्या खटल्यात चारही आरोपींना वेगवेगळ्या कलमांखाली दोषी ठरविण्यात आले होते. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, पाली यांच्या निर्णयास आरोपींनी सत्र न्यायालयामध्ये आव्हान दिले होते. या अपिलाची सुनावणी माणगाव येथील अतिरिक्त सत्रन्यायाधीश सरदेसाई यांच्या  न्यायालयात झाली. सुनावनीअंती आरोपींना दोषी ठरवून प्रत्येकी एक वर्ष  सक्तमजुरी व प्रत्येकी ५०० रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे.

यातील महिला आरोपीला कलम ३२३ खाली दोषी ठरवून एक वर्ष मुदतीच्या चांगले  वर्तवणुकीच्या बंधपत्रावर सोडण्यात आले.

दंडाच्या रकमेपकी २ हजार रुपये फिर्यादीस नुकसानभरपाई देण्याचा आदेशदेखील न्यायालयाने दिला आहे. याप्रकरणी अभियोग पक्षातर्फे जिल्हा शासकीय अभियोक्ता अ‍ॅड. प्रसाद पाटील  यांनी कामकाज पाहिले.

 

बांगलादेशी दाम्पत्याला सक्तमजुरी

अलिबाग : पासपोर्ट कायदा व परदेशी नागरिक कायदा यांचा भंग करून मुरूड तालुक्यातील आगरदांडा येथे केझार रतलामवाला यांच्या बंगल्यात वास्तव्य करून बेकायदेशीरपणे भारतात राहिल्याप्रकरणी रहिम महसीन शेख, व जस्मीनबीबी रहिम शेख या दोघा बांगलादेशींना अलिबाग येथील सत्र न्यायालयाने दोषी ठरविले. या दोन्ही आरोपींना पासपोर्ट कायदा व परदेशी नागरिक कायदा अन्वये दोषी ठरवून प्रत्येक कायद्याखाली प्रत्येकी एक वर्ष सक्तमजुरी व प्रत्येकी १० हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. आरोपी रहिम महसीन शेख, व जस्मीनबीबी रहिम शेख घुसखोर बांगलादेशी नागरिक असून त्यांच्याकडे बांगलादेशातून भारतात येण्याकरिता आवश्यक पासपोर्ट, व्हिजा किंवा इतर शासकीय वैध परवाना नाही. त्यांनी भारत-बांगलादेशी सीमेवरून अवैध मार्गाने प्रवेश करून संगनमताने फसवणूक करून पश्चिम बंगाल येथील बनावट मतदान ओळखपत्रे बनवून देशात कोलकाता, हावडा, मुंबई, मुरुड, आगरदांडा येथे वास्तव्य केले. भारतीय पारपत्र प्रवेश अधिनियम व  ‘विदेशी नागरिक अधिनियम’ व भा.दं.वि.सं.कलम ४२०, ४६८सह. ३४ प्रमाणे गुन्हा केल्याबाबत दोषारोपपत्र मुरुड पोलिसांनी दाखल केले होते. हा खटला अलिबाग येथील सहायक सत्र न्यायाधीश नेरलेकर यांच्या  न्यायालयात चालला. अभियोग पक्षातर्फे अति. शासकीय अभियोक्ता अ‍ॅड. आश्विनी बांदिवडेकर- पाटील यांनी एकूण तीन साक्षीदारांची साक्ष नोंदविली.  न्यायालयात सादर करण्यात आलेला पुरावा ग्राह्य़ धरून न्यायालयाने आरोपींना  दोषी ठरविले व शिक्षा सुनावली. बांगलादेशी घुसखोर विभागाचे प्रमुख प्रल्हाद माने यांनी या प्रकरणाचा तपास केला.