पालिकेतर्फे शुक्रवारी शहरातील मुख्य रस्त्यावरील गटारीवर असलेले अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू करण्यात आली. या मोहिमेचे मनमाडकरांनी स्वागत केले आहे. गटारींवरील अतिक्रमण संपूर्णपणे काढून टाकण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर यांनी दिली. पालिकेच्या अधिकाऱ्यांसह ३० पेक्षा अधिक कामगार या मोहिमेत सहभागी झाले आहेत. एक जेसीबी, तीन ट्रॅक्टर यांचा वापर या मोहिमेत करण्यात येत आहे. मुख्याधिकारी डॉ. मेनकर हे स्वत: मोहिमेवर लक्ष ठेवून होते. जुन्या नगरपालिका इमारतीच्या परिसरातील रेल्वे पुलाच्या कोपऱ्यावर सकाळी या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. या वेळी बघ्यांची गर्दी उसळली होती. गटारीवरील बांधकाम, पायऱ्या, ओटे काढण्यात आले. ही मोहीम सुरू असताना बाजारपेठेतील अनेक दुकानदारांनी आपल्या दुकानासमोर गटारीवर असलेली अतिक्रमणे स्वत:हून काढून घेण्यास सुरुवात केली. यामुळे नेहरू रोड परिसर मोकळा झाल्याचे दिसू लागले.  अतिक्रमणामुळे शहरातील प्रमुख रस्ते अरुंद झाले आहेत. त्यातच गटारींवरील बांधकामामुळे गंभीर परिस्थिती निर्माण होऊन गटारी तुंबल्या आहेत. वेळोवेळी तुंबलेल्या गटारीचे सांडपाणी रस्त्यावर येत असल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. गटारीवरील बांधकामामुळे सफाई कामगारांना साफसफाई करण्यास अडथळा निर्माण होतो. पालिका प्रशासनाने याची दखल घेत दहा दिवसांपूर्वी गटारीवरील अतिक्रमण काढून घेण्याची सूचना दिली होती. शहरातील नागरिकांनाही ध्वनिक्षेपकावरून अतिक्रमण काढण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर शुक्रवारी सकाळपासून मोहीम सुरू करण्यात आली. पालिकेने कोणताही भेदभाव न करता सर्वच अतिक्रमणे काढावीत, अशी मागणी या वेळी करण्यात आली.