उद्यापासून सुरु होणाऱ्या ठाकूरदेव यात्रेवर पोलिसांची नजर 

नक्षलवाद्यांनी २३ डिसेंबरला जाळलेली ८० वाहने सूरजागड पहाडावर अद्याप पडूनच असून ती खाली कशी आणायची, हा प्रश्न लॉयड मेटल्स व्यवस्थापन व वाहतूकदारांपुढे आहे. पोलिसांनी जबाब नोंदविण्यास सुरुवात केली असून कंपनीचा व्यवस्थापक व जहाल नक्षल कमांडर साईनाथचा नातेवाईक इरपा उसेंडीकडे पोलिसांचे विशेष लक्ष आहे, तर कंपनी व नक्षलवाद्यांमधील मध्यस्थ म्हणविणारा राजू राजस्थानात फरार झाल्याची माहिती आहे. ५ जानेवारीपासून सूरजागडावर ठाकूरदेवाची यात्रा सुरू होणार असून यात मोठय़ा संख्येने नक्षलवादी सहभागी होणार असल्याची माहिती आहे.

आज दहा दिवसानंतरही सूरजागड व एटापल्ली परिसरात कमालीची भीतीयुक्त शांतता आहे. कारण, एटापल्ली या तालुक्याच्या ठिकाणचे नियमित व्यवहार सोडले, तर बंदसदृश्य वातावरण आहे. दहा दिवसानंतरही ही वाहने पहाडावर तशीच पडून असून ती खाली आणायची कशी, हा प्रश्न वाहतूक कंपनी व लॉयड मेटल्सला पडला आहे. कारण, पोलिस बंदोबस्तात यासाठी ते पहाडावर गेले, तर नक्षली हल्ला होण्याची भीती असल्यामुळे ती हिंमत कुणीही करत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. या घटनेत वाहतूक कंपन्यांचे मोठे नुकसान झाले असून त्यांनीही लॉयडकडे भरपाईसाठी तगादा लावला आहे. या घटनेनंतर आता पोलिसांकडून धरपकड व जाबजबाब घेणे सुरू झाले आहे. या संपूर्ण घटनाक्रमात कंपनीचा स्थानिक व्यवस्थापक व इरपा उसेंडीची भूमिका महत्वाची राहिलेली आहे. त्यामुळेच घटनेनंतर लगेच पोलिसांनी इरपाला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. सध्या फक्त इरपाच नाही, तर या संपूर्ण घटनाक्रमात कंपनी व नक्षलवाद्यांच्या संपर्कात असलेल्या प्रत्येकावर पोलिसांचे बारीक लक्ष आहे. या दोघांमधील महत्वाचा दुवा म्हणवून घेणारा राजू नावाचा इसम राजस्थानात फरार झाला असून तो सुरुवातीला एटापल्लीत ब्लॅंकेट विकायचा. त्यानेच लॉयड कंपनीचे अधिकारी व नक्षलवाद्यांची एक-दोनदा बैठक घडवून आणल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, ५ जानेवारीपासून तीन दिवसांची सूरजागड यात्रा सुरू होत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ज्या वर्षी नक्षल हालचाली कमी असतात त्या वर्षी यात्रेला नगण्य गर्दी असते. मात्र, ज्या वर्षी हालचाली वाढतात तेव्हा बरीच गर्दी होते. हे लक्षात घेऊन यंदा यात्रेला मोठी गर्दी होणार असल्याचे संकेत आहेत. केवळ गडचिरोलीच नाही, तर छत्तीसगड, तेलंगणा व आंध्रप्रदेशातूनही लोक यात्रेसाठी येतात. नक्षलवादीही बहुसंख्येने येत असल्याची माहितीही सूत्रांनी दिली. त्यामुळे ही यात्रा यंदा अनेक अर्थाने महत्वाची ठरणार आहे.

नक्षलवाद्यांविरोधात मोठय़ा मोहीमेची शक्यता

जाळपोळीनंतर एटापल्ली व परिसरातील ५४ गावांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. हे विशेष. कारण, त्यांना लॉयडचा लोह उत्खनन प्रकल्प येथे नकोच आहे. त्यातच या यात्रेवर जिल्हा पोलिस दलाचे लक्ष आहे. यात कोण कोण येतात, याची माहिती खबऱ्यांकडून घेतली जात आहे. नक्षलविरोधी अभियानचे अप्पर पोलिस महासंचालक विपीन बिहारी व नक्षल अभियानाचे विशेष पोलिस महानिरीक्षक शिवाजी बोडखे यांनी सोमवारी पोलिस मुख्यालयातील बैठकीत या यात्रेविषयीची संपूर्ण माहिती घेऊन लक्ष ठेवण्याचे निर्देश दिल्यामुळे यात्रा काळात किंवा नंतर नक्षल्यांविरोधात मोठी पोलिस मोहीम उघडण्याची शक्यता आहे. दरम्यान, यासंदर्भात एटापल्लीचे पोलिस निरीक्षक शिवाजी राऊत म्हणाले की, इरपा उसेंडीच्या जीवाला धोका असल्यामुळे त्याच्यावर पोलिसांची पाळत आहे. तसेच एटापल्ली शाळेतील दोन मुलींच्या बेपत्ता होण्याशी नक्षल्यांचा काहीही संबंध सध्या तरी दिसत नाही. प्रेमप्रकरणातून त्या बेपत्ता झाल्या असाव्यात. कारण, यापूर्वीही दिवाळीत दोघींपैकी एक मुलगी अशीच बेपत्ता झाली होती.