गडचिरोली जिल्हा पोलिस दलाने सावरगाव, येरकड, गोडलवाही, हालेवारा, हेडरी, बुरगी व कोटमी या सात नक्षलग्रस्त गावातच पोलिस मदत केंद्र सुरू केल्याने गेल्या काही महिन्यात नक्षलवाद्यांच्या कारवाया कमी झाल्या आहेत. शहीद सप्ताहातही नक्षलवाद्यांना एक दोन स्मारके उभारण्याशिवाय काहीही करता आले नाही. याचाच अर्थ, पोलिसांची जरब वाढत असून त्या तुलनेत नक्षलवादी संघटन कमकुवत झाले आहे.
गडचिरोलीच्या घनदाट जंगलात २८ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत नक्षलवाद्यांनी शहिद सप्ताह साजरा करण्याचे आवाहन आदिवासींना केले होते. मात्र, /ी शह१द सप्ताहाला आदिवासींनी भीकही घातली नाही. या काळातही अतिदुर्गम भागात सर्व व्यवहार अतिशय सुरळीत सुरू होते. पूर्वी शहीद सप्ताह म्हटले की,  पोलिस दलासमोर मोठे आव्हान असायचे. मात्र, नक्षलवाद्यांची दंडकारण्यातील शक्ती कमी झाल्याने यंदा सप्ताहात त्यांना काहीही करता आले नाही. सप्ताहापूर्वी नक्षलवाद्यांनी तीन निर्दोष व्यक्तींची हत्या केली. मात्र, त्याचा फारसा प्रभाव अतिदुर्गम भागातील नक्षलग्रस्त गावातही बघायला मिळाला नाही. पूर्वी या जिल्ह्य़ातील सर्व १२ तालुक्यांमध्ये नक्षल्यांचा प्रभाव दिसत होता. आज एटापल्ली, भामरागड, धानोरा व कुरखेडा या चार तालुक्यातील गावांमध्येच ही चळवळ काही प्रमाणात सक्रीय आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार नक्षलग्रस्त गावांमध्येच पोलिस मदत केंद्र सुरू करण्यात आलेली आहेत. पूर्वी जेथे पोलिस शिपाई किंवा सी-६० कमांडो पोहोचूही शकत नव्हते, अशा कोटमी या पूर्ण नक्षलग्रस्त गावात पोलिस मदत केंद्र सुरू केले. परिणामत: याच गावातील १५ नक्षलवाद्यांनी स्वखुशीने शरण आले. तसेच सावरगांव, येरकड, गोडलवाही, हालेवारा, हेडरी व बुरगी या गावातही पोलिस मदत केंद्र सुरू करण्यात आल्यामुळे नक्षली कारवाया हळूहळू कमी होत गेल्या.
शहीद सप्ताहाच याच गावांमध्ये पूर्वी नक्षलवाद्यांचे साम्राज्य दिसायचे. मात्र आज पूर्ण चित्र बदलले असून आदिवासी पोलिसांना मदत करत असल्याचे चित्र  आहे. गडचिरोलीत नक्षल संघटना कमकुवत होण्याचे हे एक प्रमुख कारण आहे, तसेच पोलिस विभागातर्फे राबविण्यात येणारे सिव्हीक अ‍ॅक्शन प्रोग्राम, जनजागरण मेळावे, ग्रामभेटी यामुळे आदिवासींमध्ये जागृती निर्माण झाल्याने नक्षल संघटनेला मदत करणे कमी होऊन आदिवासींचे नक्षल संघटनेत भरती होणे कमी झाले. आत्मसमर्पण योजनेमुळे पोलिसांप्रती असलेली भीती नाहीशी झाली आहे. पोलिस मदत केंद्रामुळे जनतेला नक्षलऐवजी दुसरा पर्याय मिळाला. आजही या अतिदुर्गम भागातील पोलिस मदत केंद्रावर स्थानिकांची गर्दी बघायला मिळते. आज सात पोलिस मदत केंद्रे सुरू करण्यात आली असली तरी भविष्यात ही संख्या वाढणार आहे. त्यामुळे नक्षलवाद्यांना गडचिरोलीच्या जंगलात स्थानिकांकडून कुठलीही मदत मिळणार नाही, हे स्पष्ट आहे. ही बाब हळूहळू नक्षलवाद्यांनाही लक्षात आली आहे. त्याचाच परिणाम आज आत्मसमर्पणाच्या संख्येत वाढ झाली आहे. नक्षलवाद्यांनी मोठय़ा उत्साहात शहिद सप्ताहाची घोषणा केली खरी, परंतु एक ते दोन शहीद स्मारके बनविण्यापलिकडे काहीही करता आले नाही. भविष्यात ही चळवळ जंगलातून हद्दपार होईल, अशीच काहीशी परिस्थिती पोलिस दलाच्या सक्रीयतेमुळे दिसून येत आहे.