शेतीला प्रतिष्ठा आणि मराठा समाज आरक्षणाला सरकारने प्राधान्य द्यायला हवे, असे मत सावंतवाडी संस्थानच्या राजमाता श्रीमंत सत्त्वशीलादेवी भोसले यांनी व्यक्त केले. राज्यात मराठा समाजाचे निघणारे मूक क्रांती मोर्चे त्याचे बोलके चित्र आहे, असे त्या म्हणाल्या.

राजवाडय़ात श्रीमंत सत्त्वशीलादेवी भोसले यांनी मराठा समाज आरक्षणाबाबतचे मत व्यक्त केले. या वेळी सुपुत्र श्रीमंत खेमसावंत भोसले उपस्थित होते.

राज्यभरात मराठा समाजाचे मूक क्रांती मोर्चे शांततेत निघत आहेत. मराठा समाजाचे हे विराट दर्शन राज्यालाच नव्हे तर जगाला घडले आहे. त्यामुळे सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांना न्याय द्यायला हवा, असे श्रीमंत सत्त्वशीलादेवी भोसले म्हणाल्या.

राजकीय पक्षाच्या नेत्यांना किंवा लोकप्रतिनिधींना मराठा क्रांती मोर्चात शेवटचे स्थान दिले आहे. त्यामुळे मराठा समाज आपल्या पुढील वाटचालीसाठी एकत्र आला. त्यामुळे सरकारला या मागण्यांचा विचार करावाच लागेल, असे राजमाता भोसले म्हणाल्या.

मराठा समाजाने शेती व्यवसायात स्थान निर्माण केले आहे. पण शेती व्यवसायाला सरकारदरबारी प्रतिष्ठा नाही. शेतीला प्रतिष्ठा मिळायला हवी तसेच शेती उत्पादनाला मार्केटिंग आणि शेती-व्यवसायाला पूरक मनुष्यबळ मिळायला हवे. त्यासाठीही सरकारने खबरदारी घेतली पाहिजे. नोकऱ्या किंवा रोजगार सर्वानाच मिळणार नसल्याने शेती व्यवसायाला सरकारने प्रतिषठा मिळवून द्यायला हवी, असे राजमाता भोसले म्हणाल्या.

मराठा समाजाची मुले उच्चशिक्षित आहेत त्यांना आरक्षणामुळे नोकऱ्या नाहीत. ज्यांना शिकायचे आहे त्यांना आर्थिक खर्च परवडत नाही. त्यामुळे शैक्षणिक आरक्षण, नोकरीत आरक्षण, उद्योग-व्यवसायात आरक्षण अशा धोरणांची गरज निर्माण झाली आहे, असे राजमाता भोसले म्हणाल्या.

जनतेसाठी लढणाऱ्या मराठा समाजाने एके काळी शस्त्रे हातात घेतली, तो लढतच राहिला, पण लोकशाहीत सर्व आघाडय़ांवर उपेक्षित राहिल्याची भावना राजमातानी व्यक्त केली. मराठा समाज एकवटला आहे, त्यामुळे समाजाच्या मागण्या सरकारला पूर्ण कराव्याच लागतील. पण सरकारशी चर्चा करताना मराठा समाजाचा सर्वागीण विकास डोळ्यांसमोर ठेवला गेला पाहिजे, असे त्या म्हणाल्या.