कोपर्डी घटनेचा निषेध आणि अॅट्रॉसिटी कायद्यात दुरुस्ती यासह विविध मागण्यांसाठी बुधवारी शहरात काढण्यात आलेल्या मराठा क्रांती मूक मोर्चात लाखोंचा जनसागर उसळला. एक ऐतिहासिक मोर्चा शहराने अनुभवला. त्याद्वारे शिस्तीचे अनोखे उदाहरण समोर ठेवले गेले.

सकाळपासून साक्री, शिंदखेडा, शिरपूर आणि धुळे या चारही तालुक्यातून शेकडो वाहने शहरात दाखल होऊ लागली. वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पोलिसांनी शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळवली. केवळ मोर्चासाठी येणारी वाहने आणि एसटी बसला शहरात प्रवेश देण्यात आला. धुळ्यातील पारोळा रस्त्यावरील गिंदोडीया चौकात मराठा बांधव जमण्यास सुरुवात झाली. तीन तासात या ठिकाणी लाखोंची गर्दी झाली. गेल्या काही दिवसांपासून चाललेल्या जय्यत तयारीचे प्रतिबिंब मोर्चात उमटले. नऊ मुलींनी मराठा समाजाच्या भावना व्यक्त केल्यानंतर मोर्चाला सुरूवात झाली. मोर्चा जिथून सुरू झाला तिथून  जिथे समारोप होणार होता, तिथपर्यंत पाय ठेवण्यास जागा नव्हती. मोर्चात युवतींचा लक्षणीय सहभाग होता. गर्दीच्या व्यवस्थापनाची जबाबदारी पाच हजार स्वयंसेवकांनी चोखपणे बजावली. हजारो युवतींच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चात महिला, त्यानंतर डॉक्टर, अभियंते, वकील, युवक, नागरिक या क्रमाने राजकीय नेत्यांना शेवटचे स्थान देण्यात आले.

कोपर्डी प्रकरणाचे निषेध फलक मोर्चेकऱ्यांच्या हाती होते. भगवे झेंडे, भगव्या टोप्या व फेटे यामुळे वातावरण भगवेमय झाले. विविध धार्मिक व स्वयंसेवी संघटनांनी ठिकठिकाणी मोर्चेकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. अनेक स्थानिक लोकप्रतिनिधी सामान्य कार्यकर्ते म्हणून काम करत होते. मोर्चेकऱ्यांना मार्गदर्शन, महिलांना, वृध्द, बालकांना पाणी पाऊच देणे, शिस्त ठेवण्यासाठी सूचना देण्यासाठी त्यांची धावपळ सुरू होती. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या कुटुंबियांनी मोर्चात हजेरी लावली. शिवतीर्थ चौकात दुपारी एकच्या सुमारास मोर्चा पोहचला. या ठिकाणी मुलींनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाचे वाचन केले. त्यानंतर कोपर्डीतील पीडित मुलगी आणि शहिद जवांनाना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. राष्टगीत झाल्यानंतर मोर्चाची सांगता करण्यात आली. मोर्चा दरम्यान शहरातील दैनंदिन व्यवहार ठप्प झाले. शाळांनाही सुटी देण्यात आली होती. जवळपास दीडहजार पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बंदोबस्ताची जबाबदारी सांभाळली.

मोर्चेकऱ्यांना उन्हाचा त्रास

मोर्चात सहभागी झालेल्या अनेकांना उन्हामुळे त्रास सहन करावा लागला. लाखोंच्या गर्दीत श्वास घेण्यास काहींना त्रास झाला. त्यामुळे जवळपास १५० मोर्चेकऱ्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यात महिलांची संख्या अधिक होती.