रत्नागिरी जिल्ह्य़ातील मराठा समाजाचा मूक मोर्चा येत्या १६ ऑक्टोबरला चिपळूणमध्ये काढण्यात येणार आहे. मराठा समाजाची जिल्हा पातळीवरील बैठक काल चिपळूणमध्ये झाली. समाजाचे विविध क्षेत्रातील मान्यवर, सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, आमदार, कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते. रत्नागिरी हे जिल्ह्य़ाचे मुख्यालय असल्यामुळे तेथे हा मोर्चा काढण्यात यावा, अशी सूचना उपस्थितांपैकी काही जणांनी केली. पण जिल्ह्य़ाच्या उत्तर भागातील मंडणगड, खेड, दापोली या तालुक्यांमधील लोकांच्या दृष्टीने ते गैरसोईचे असल्यामुळे संपूर्ण जिल्ह्य़ाच्या दृष्टीने मध्यवर्ती म्हणून चिपळूणवर शिक्कामोर्तब करण्यात आले.

या निर्णयानुसार १६ ऑक्टोबर रोजी सकाळी चिपळूणमधील पवन तलाव मैदानापासून छत्रपती शिवाजीमहाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून मोर्चाला प्रारंभ होणार आहे. तेथून मरकडी, बहादूर शेख नाकामार्गे प्रांताधिकारी कार्यालयावर निवेदन देऊन मोर्चाची सांगता होणार आहे.   जिल्हाभरातून सुमारे ५ ते ७ लाख समाजबांधव मोर्चामध्ये सहभागी व्हावेत या दृष्टीने नियोजन केले जात असून, त्यासाठी तालुका आणि विभागवार समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. तसेच चिपळूणमधील वांगडे शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.