कोपर्डीतील घटनेच्या निषेधार्थ येथे २८ सप्टेंबरला काढण्यात येणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या तयारीसाठी आयोजित बैठकीत सर्वानी एकजुटीने काम करण्याचा निर्धार सर्वपक्षीय मराठा नेत्यांनी केला.

येथील केशरानंद गार्डनमध्ये झालेल्या बैठकीत मोर्चाचा मार्ग, वाहतूक व्यवस्था, स्वयंसेवकांचे पथक, मोर्चाची आदर्श आचारसंहिता यासह इतर विषयांवर चर्चा झाली. मोर्चासाठी काही जणांनी स्वयंस्फूर्तीने देणगी दिली. काही जणांनी वाहनांची व्यवस्था करण्याचे जाहीर केले. मोर्चेकऱ्यांसाठी अल्पोपाहार, त्यासाठी आवश्यक साहित्य व जागा देण्याची तयारी काहींनी दर्शवली. स्वच्छता समितीमध्ये महाविद्यालयीन तरुण, नगरसेवक, मल्ल, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, शिक्षक, शासकीय सेवानिवृत्त कर्मचारी यांनी आपली नावे नोंदविली. मोर्चासाठीच नव्हे, तर यानंतरही सर्व समाजबांधवांनी एकजुटीने राहावे. त्यामुळे इतर प्रश्नांनाही वाचा फोडता येते. त्यामुळे संघटित राहण्याचा निर्धार करण्यात आला. यावेळी माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, आमदार कुणाल पाटील, माजी आमदार प्रा. शरद पाटील, रामकृष्ण पाटील, ज्ञानेश्वर भामरे आदी उपस्थित होते.