भारत विकास प्रतिष्ठानच्या वतीने शासनाच्या अनुदानाशिवाय मराठवाडास्तरीय चारा छावणीचा प्रारंभ उस्मानाबाद तालुक्यातील कवठा येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते गुरुवारी (दि. २५) होणार आहे. शासकीय मदतीविना सुरू होणारी मराठवाडय़ातील ही पहिलीच चारा छावणी आहे.
आदर्श ग्रामयोजनेचे अध्यक्ष पोपटराव पवार यांची या वेळी उपस्थिती असेल. जलसंधारण योजनेचा प्रारंभही या वेळी केला जाणार आहे, अशी माहिती संयोजक विनायकराव पाटील यांनी दिली. पाटील यांच्या पुढाकाराने गत वर्षीही येथे चारा छावणी सुरू केली होती. मराठवाडय़ाच्या कुठल्याही भागातील जनावरांचे पालनपोषण येथे केले जाणार आहे. परिसरात १० गावे दत्तक घेऊन या गावांतील दुष्काळग्रस्तांसाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचा संस्थेचा संकल्प आहे. ही छावणी ६ महिने सुरू रहाणार असून दररोज २० किलो चारा व एक किलो खाद्य जनावराला दिले जाणार आहे. लसीकरण, तसेच जनावराच्या दुधाची येथे विक्री करून ही रक्कम शेतकऱ्यांच्या नावे वर्ग केली जाणार आहे. जनावरांच्या शेणापासून गांडुळ खत तयार केले जाणार असून पुन्हा शेतकऱ्यांना हे खत वाटप केले जाणार आहे.
कवठा गावाजवळील ओढय़ावर चार किलोमीटर परिसरात खोलीकरण केले जाणार असून, तेरणा नदीच्या पात्राचे पुनर्जीवन केले जाणार आहे. माकणी धरण ते मांजरा नदीच्या संगमापर्यन्त दोन्ही बाजूंची काटेरी झुडपे चार महिन्यांत साफसफाई करून नालाखोल व वनराई बंधारा बांधण्याचा प्रतिष्ठानचा संकल्प आहे. शेतकऱ्यांना येथे निवासाची सोय केली असून, दर रविवारी आधुनिक तंत्रज्ञान व शेतीविषयक माहितीचे मार्गदर्शन कृषी विद्यापीठाचे तंत्रज्ञ करणार आहेत.
जिल्हय़ात या वर्षभरात ६३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. आत्महत्या थांबविण्यासाठी भारत विकास प्रतिष्ठान प्रयत्नशील असून, जिल्हय़ातील सरपंचांना या वेळी निमंत्रित केले आहे. सरपंचांनी गावात शिबिरे घेऊन मार्गदर्शन करावे, असा सल्ला दिला जाणार आहे.