‘प्रत्येकामध्ये कोणती ना कोणती कला असते. नुसत्या कलेच्या मागे न जाता आपण घेत असलेले शिक्षण सांभाळून कलेकडे लक्ष द्या म्हणजे तुम्हाला यश निश्चित मिळेल. कलाकार उच्चशिक्षित असल्यास त्याची पुढील वाटचाल सुकर होते. विद्यापीठस्तरीय स्पर्धामध्ये स्वत:हून सहभागी व्हा’ असा मोलाचा सल्ला अभिनेते संजय खापरे यांनी येथे विद्यार्थ्यांना दिला. कोकण ज्ञानपीठ कर्जत अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये वसंतोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. अभिनेते संजय खापरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून समारंभाचे उद्घाटन करण्यात आले.
या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष कॅप्टन सारिपुता वांगडी, खजिनदार झुलकरनन डाभिया, सचिव प्रदीप शृंगारपुरे, माजी नगराध्यक्ष शरद लाड, स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य विजय मांडे, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवींद्र देशमुख, प्रा. मिलिंद लाड, प्रा. नीलेश लाड आदी व्यासपीठावर उपस्थित होते. प्राचार्य डॉ. मोहन लेंगरे यांनी उपस्थितांचे स्वागत करून महाविद्यालयाचा चढता आलेख सादर केला. विद्यार्थी प्रतिनिधी मयूरेश ठोंबरे याने विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थिनी प्रतिनिधी प्राजक्ता पाटील, सांस्कृतिक विभाग सचिव अमोल दळवी, कीडा विभाग सचिव सौरभ बडेकर यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. अभिनेते संजय खापरे यांनी एक विनोदी प्रवेश सादर करून सर्वाचीच मने जिंकली. सारिपुता वांगडी यांनी विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार पुढील वर्षीसुद्धा वसंतोत्सव तीन दिवस होईल, असे स्पष्ट केले. त्या वेळी विद्यार्थ्यांनी सभागृह डोक्यावर घेतले. प्रदीप शृंगारपुरे यांनी आपल्या भाषणात संस्थेच्या वाटचालीची माहिती दिली. सूत्रसंचालन तेजस जोशी आणि प्रा.श्वेता रावराणे यांनी केले.