साठवण क्षमतेवर परिणाम; स्थानिक लोकप्रतिनिधींचे मात्र मौन

प्रस्तावित मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला जमीन देण्यास विरोध होत असतानाही त्याकडे कानाडोळा करीत प्रशासकीय यंत्रणा भूसंपादनाचे काम पुढे रेटत असताना दुसरीकडे तसाच किंबहुना त्याहून गंभीर प्रकार नागपूर-सुरत या महामार्गाच्या चौपदरीकरणात घडत असल्याचे समोर आले आहे. या कामात धुळे जिल्ह्याची भिस्त असलेल्या अक्कलपाडा प्रकल्पालगतचे डोंगर भूसुरुंगाद्वारे सपाट करत दगड-गोटे व मुरूमाचे ढिगारे धरणात टाकले जात आहेत. परिणामी, प्रकल्पाला धोका निर्माण झाला असून, त्याच्या साठवण क्षमतेवरही परिणाम होणार आहे. धरणात दररोज शेकडो डंपर दगड व माती ओतली जात असताना स्थानिक लोकप्रतिनिधींनी बाळगलेले मौन आश्चर्यकारक आहे.

साक्री तालुक्यातील अक्कलपाडा हा बहुचर्चीत प्रकल्प वेगवेगळ्या कारणांनी सातत्याने चर्चेत राहिला आहे. संपूर्ण धुळे जिल्ह्यातील शेतकरी आणि रहिवाशांसाठी महत्त्वाचा असलेला हा प्रकल्प स्थानिक राजकारणात कमालीचा प्रतिष्ठेचा ठरला. त्याची परिणती माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या पराभवात झाल्याचा इतिहास आहे. अक्कलपाडा प्रकल्पाचे भिजत राहिलेले घोंगडे रोहिदास दाजींच्या राजकीय भवितव्यात खंड पाडण्यास पुरेसे ठरले. आता या प्रकल्पाकडे केवळ राजकीय लाभ म्हणून पाहिले जाते. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची पूर्तता सुरू असली तरी दुसरीकडे त्याची साठवण क्षमता कमी करण्याचे उद्योग वेगात असल्याचे दिसून येते. त्याकडे शेतकऱ्यांसह लोकप्रतिनिधींनी सोईस्करपणे दुर्लक्ष करण्याची भूमिका घेतली आहे.

प्रकल्पाला लागून नागपूर-सुरत महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्याकरिता डोंगर-टेकडय़ा फोडल्या जात आहेत. त्यातून निघणारे दगड-धोंडे, माती व मुरुम अक्कलपाडा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात टाकले जाते. भूसुरुंगाचा वापर करण्याबाबतची परवानगी राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाने घेतलेली नाही. दिवसभरात शेकडो डंपरद्वारे हे ढिगारे टाकले जातात. या संदर्भात ओरड झाल्यावर या प्रकल्पाची देखभाल, दुरुस्तीची जबाबदारी सांभाळणाऱ्या यंत्रणेला साक्षात्कार झाला. कागदी घोडे नाचवत मातीचे ढिगारे धरणात रिते करणाऱ्या संस्थेला इशारा देण्यापलीकडे काही घडले नाही. या प्रकल्पाच्या खोलीकरणासाठी कोटय़वधींचा खर्च झाला असताना आता प्रकल्प बुजवण्याची मोहीम सुरू झाल्याचे दिसत आहे.

दुष्काळी स्थितीमुळे पांझरा नदीवरील अक्कलपाडा, निम्नपांझरा प्रकल्प कधी भरेल, याची उत्सुकता आणि चिंता लागून जिल्हावासीयांना आहे. यंदा पावसाचे प्रमाण कमी आहे. यामुळे जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्पात अपेक्षित जलसाठा झालेला नाही. काही प्रकल्प कोरडेच आहेत. त्यात पाणी साठवण्याची सर्वाधिक क्षमता असलेल्या अक्कलपाडामध्ये हजारो ब्रास दगड, मातीचे ढिगारे टाकले जात असल्याने उद्भवणाऱ्या संकटातून या प्रकल्पास वाचविण्याची वेळ आली आहे. रोहिदास पाटील यांचे पुत्र आ. कुणाल पाटील यांनीही त्याकडे सोईस्करपणे कानाडोळा केला आहे. नागपूर-सुरत महामार्गाच्या कामात फोडावे लागणारे डोंगर व टेकडय़ा, त्यातून निघालेला दगड-मातीचा भराव कुठे टाकला जातो, बेकायदेशीर भराव टाकणाऱ्यांविरोधात अधिकाऱ्यांनी काय कारवाई केली, याची माहिती घेण्याची तसदी लोकप्रतिनिधींनी घेतली नाही. अक्कलपाडा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी आंदोलन करणाऱ्या आणि बाधीत गावातील राजकीय मंडळींनी याकडे कानाडोळा केला आहे. प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात बेकायदा भराव टाकले जात असल्याची बाब कार्यकारी अभियंता आर. एस. बडगुजर यांनी मान्य केली. यासंदर्भात संबंधित यंत्रणेला लेखी पत्र देऊन इशारा देण्यात आला आहे. उपरोक्त भराव उचलले न गेल्यास कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सूचित केले.

भूसुरुंग स्फोटामुळे प्रकल्पाला धोका

मध्यम प्रकल्प विभागाने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या प्रकल्प संचालकांना पत्र दिले आहे. धरणाच्या बुडीत क्षेत्रात टाकण्यात येणारे दगड-धोंडे, माती तातडीने उचलावे, असे सांगण्यात आले आहे. चौपदरीकरणाच्या कामासाठी आवश्यक ठिकाणी भूसुरुंगाचा वापर केला जातो. मात्र यासाठी तापी पाटबंधारे विकास महामंडळाकडे परवानगीसाठी केवळ प्रस्ताव दाखल करून भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या प्रकल्प संचालकांनी पाठ फिरविली. नियंत्रित पद्धतीने सुरुंग वापरण्याच्या परवानगीसाठी प्रकल्प संचालकांचा प्रतिनिधीही उपस्थित झाला नाही. याची जाणीव मध्यम प्रकल्प विभागाच्या अधिकाऱ्यांनी करून दिली आहे. तरीही ‘भुसुरुंगा’ची कामे सुरूच असून यामुळे प्रकल्प आणि कालवा यांना धोका होऊ  शकतो अशी भीती व्यक्त करण्यात आली. हे काम बंद न केल्यास होणाऱ्या परिणामाची जबाबदारी महामार्ग प्राधिकरणावर निश्चित केली जाईल, असा इशारा देण्यात आला. ११ जुलै २०१७ च्या या पत्रानंतरही बुडीत क्षेत्रात भराव करणे सुरूच राहिले. वरिष्ठांकडून तंबी दिली गेल्यावर भरावातील काही दगडधोंडे उचलून ते पुढील भागात टाकले गेले. मात्र, या आधी टाकलेले ढिगारे पाण्याखाली गेले आहेत. वरच्या भागात पाऊस झाल्याने अक्कलपाडा प्रकल्पात जलसाठा वाढत आहे. यापूर्वी ज्या खड्डय़ांमध्ये भराव करण्यात आला होता, तो पूर्णपणे पाण्याखाली बुडाला आहे. यामुळे प्राधिकरणाला ते ढिगारे उचलण्याचे कष्ट पडले नाहीत. परंतु, यामुळे प्रकल्पाची साठवण क्षमता कमी झाली आहे.