रायगड जिल्ह्य़ातील आक्षी येथील शिलालेख हा मराठीतील पहिला शिलालेख म्हणन ओळखला जातो. सुमारे एक हजार वर्षांपूर्वीचा हा ऐतिहासिक शिलालेख गेली कित्येक वर्षे दुर्लक्षित अवस्थेत पडून आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी एकीकडे पावले उचलली जात आहे. तर इतिहासाचा हा अनमोल ठेवा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
कर्नाटक राज्यातील श्रवण बेळगोळ येथील बाहुबली गोमटेश्वरांच्या मूर्तीखाली लिहिलेला शिलालेख हा मराठीतील पहिला शिलालेख मानला जातो. हा शिलालेख इस १११६-१७च्या दरम्यान कोरला गेला असल्याचे दाखले मिळतात. गंग राजघराण्यातील चामुण्डाराय या मंत्र्याने या गोमटेश्वराची मूर्ती तत्कालीन राणीच्या आग्रहास्तव बनवून घेतली. या मूर्तीखाली एक शिलालेख कोरण्यात आला. त्यात कन्नड, तमिळ आणि मराठी भाषा कोरली गेली. श्री चामुण्डाराये करवियले, गंगाराये सुत्ताले करवियले अशी वाक्ये या शिलालेखावर आढळतात. मात्र, रायगड जिल्ह्य़ातील आक्षी येथे याहूनही जुना एक शिलालेख आढळून आला आहे. मात्र पुरातत्त्व विभागाच्या अनास्थेमुळे हा शिलालेख दुर्लक्षित अवस्थेत पडून आहे. ज्येष्ठ पुरातत्त्वज्ञ डॉ. श. गो. तुळपुळे यांच्या संशोधनानुसार हा मराठीतील पहिला शिलालेख असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिलालेखाची निर्मिती शके ९३४ म्हणजे इ.स.१०१२ झाल्याचा स्पष्ट उल्लेख या शिलालेखावर आहे.
आक्षी येथे खोदकाम करताना सापडलेल्या या शिलालेखावर देवनागरी लिपीत नऊ ओळी कोरण्यात आल्या आहेत. या लिपीवर संस्कृत भाषेचा प्रभाव आहे. पश्चिम समुद्रपती श्री कोकण चक्रवर्ती केसीदेवराययांच्या महाप्रधान भरजु सेणुई याने हा शिलालेख कोरून घेतला असून, महालक्ष्मीदेवीच्या बोडणासाठी दर शुक्रवारी नऊ कुवली धान्य देण्याचा उल्लेख इथे करण्यात आला आहे. शके ९३४ मधील प्रभव संवत्सर अधिक कृष्णपक्षातील शुक्रवारी हा निर्णय घेतल्याचा उल्लेख इथे आहे. तसेच शिलालेखाचे विद्रूपीकरण करणाऱ्याला शापही देण्यात आला आहे.
सध्या हा शिलालेख रस्त्याच्या कडेला धूळ खात पडलेला आहे. ऊनवारा आणि पाऊस खाल्ल्याने आता शिलालेखावरील अक्षरे पुसट होण्यास सुरुवात झाली आहे. वेळीच दखल घेतली नाही तर हा ऐतिहासिक ठेवा नामशेष होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली एक अभ्यासगट स्थापन केला आहे. आजवर तामिळ, तेलगू, कन्नड व संस्कृत या चार भाषांना केंद्र शासनाने हा दर्जा दिलेला आहे. भाषेच्या अभिजातपणासंबंधीचे केंद्र सरकारच्या भाषेची प्राचीनता, भाषेची मौलिकता आणि सलगता, भाषिक आणि वाङ्मयीन परंपरेचे स्वयंभूपण, प्राचीन भाषा व तिचे आधुनिक रूप असे जे निकषआहेत, त्या निकषांपकी भाषेची प्राचीनता या निकषासाठी आक्षी येथील हा आद्य शिलालेख अतिशय महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर मराठी भाषेचे वय एक हजार वर्षांपेक्षा जास्त असल्याचे सिद्ध करणारा आहे.
त्यामुळे या शिलालेखाचे संरक्षण व संवर्धन करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले जात्ो आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या शिलालेखाच्या संवर्धनासाठी पुरातत्त्व विभागाने पुढाकार घ्यावा यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी माजी आमदार मधुकर ठाकूर यांनी पत्रव्यवहार केला आहे. मात्र तरीही या शिलालेखाच्या संवर्धनासाठी कोणतीही पावले अद्याप उचलण्यात
आलेली नाहीत.

Marathi paper viral
यवतमाळ : पाटणबोरीत मराठीचा पेपर भ्रमणध्वनीवरून सार्वत्रिक
Razmanama Mahabharata in Persian language
महाभारत संस्कृतातून फारसीत; अकबराच्या साहित्यिक आविष्काराबद्दल तुम्हाला माहितेय का?
actress neena kulkarni drama aaich ghar unhach
‘ती’च्या भोवती..! : आजही आईचं घर उन्हाचंच?
unearth Harappan site near Dholavira
सोन्याच्या शोधार्थ निघालेल्या ग्रामस्थांना मिळाला तब्बल ४५०० हजार वर्ष जुना सांस्कृतिक खजिना; काय नेमके आहे प्रकरण?