परीक्षाकाळात होणाऱ्या कॉपीसारख्या गैरमार्गाना आळा घालण्यासाठी शिक्षण मंडळाने राबवलेली मोहीम राज्यात अनेक ठिकाणी यशस्वी ठरत असली तरी, ‘कॉपीमुक्त परीक्षा’ हे ध्येय अद्याप पूर्णपणे साध्य झालेले नाही. गुरुवारपासून सुरू झालेल्या बारावीच्या परीक्षांमध्येही कॉपी प्रकरणे आढळून आली आहेत. विशेष म्हणजे, इंग्रजीपेक्षाही मराठी भाषेच्या पेपरात कॉपी करताना पकडल्या गेलेल्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याचे उघड झाले आहे.
बारावीची परीक्षा गुरुवारपासून सुरू झाली. पहिलाच पेपर मराठीचा होता. या परीक्षेला राज्यभरात तब्बल १६४ विद्यार्थ्यांची कॉपी पकडण्यात आली. तर शनिवारी पार पडलेल्या इंग्रजी विषयाच्या पेपरमध्ये १३९ विद्यार्थी कॉपी करताना पकडले गेले. यामध्ये नागपूर विभागात सर्वाधिक विद्यार्थी आहेत, तर कोकण विभागात एकही कॉपी पकडण्यात आलेली नाही.
परीक्षेच्या काळात होणाऱ्या गैरमार्गाना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे ‘गैरमार्गाशी लढा’ हे अभियान चालवण्यात येत आहे. मात्र या अभियानाला नागपूर विभागात पुरेसे यश मिळाले नसल्याचे दिसत आहे. आतापर्यंत झालेल्या परीक्षेमध्ये नागपूर विभाग कॉपी करण्यात चांगलाच आघाडीवर दिसत आहे. इंग्रजीच्या परीक्षेमध्ये नागपूर विभागातील ४४ विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडण्यात आले, तर मराठीच्या पेपरलासुद्धा फक्त नागपूर विभागातून ६८ विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडण्यात आले. इंग्रजीच्या परीक्षेमध्ये पुणे विभागामध्ये १३, नाशिक विभागात ३०, औरंगाबाद विभागात १९, अमरावती विभागात २२, मुंबई विभागात ६, कोल्हापूर विभागात १ आणि लातूर विभागात २ विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडण्यात आले आहे.