पंजाबातील घुमान येथे होणार असलेल्या ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदासाठी आपण इच्छुक आहोत. संतश्रेष्ठ नामदेव व संत साहित्याचा अभ्यासक या नात्याने संमेलनाध्यक्षपदासाठी आपली उमेदवारी ज्येष्ठ साहित्यिक तथा विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी जाहीर केली आहे.
शेकापचे संस्थापक भाई उद्धवराव पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी डॉ. सबनीस येथे आले होते. पत्रकार बैठकीत आपली भूमिका सांगताना ते म्हणाले की, २२ साहित्य संमेलने राज्याबाहेर झाली. आता पंजाबातील घुमानला सारस्वतांचा मेळा होणार आहे. संतश्रेष्ठ नामदेवांनी दोन प्रदेशांची वैचारिक नाळ जोडून केलेल्या कार्याला उजाळा देण्यासाठी हे संमेलन खऱ्या अर्थाने अखिल भारतीय स्तरावरील ठरणार आहे, असे सांगून महामंडळाच्या भूमिकेचे डॉ. सबनीस यांनी स्वागत केले. संत साहित्यिक, विशेषत: संत नामदेव यांचा इहवादी दृष्टिकोनातून आपण अभ्यास केला. ज्या पद्धतीने संत साहित्याची मांडणी अनेक संदर्भ गोळा करून केली आहे, ती फुटीरवादी नाही. घुमान येथे होणाऱ्या संमेलनाचा अध्यक्ष नामदेवांचा अभ्यासक असायलाच हवा, असेही त्यांनी नमूद केले.
आपल्यापेक्षा संत साहित्यातील अधिक प्रतिभासंपन्न लेखक संमेलनाध्यक्ष म्हणून पुढे आल्यास माघार घेऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले. ज्येष्ठ साहित्यिक अशोक कामत अथवा सदानंद मोरे यांनी अध्यक्षपदासाठी उत्सुकता दाखविल्यास त्यांचा सूचक होण्यात आपल्याला आनंद असल्याचेही त्यांनी सांगितले. उस्मानाबाद ही माझी जन्मभूमी आहे. त्यामुळे संमेलनाध्यक्ष म्हणून उमेदवारी या भूमीतून जाहीर करताना विशेष आनंद आहे. भाई उद्धवराव पाटील स्मृतिदिन व गुरुपौर्णिमा असा दुग्धशर्करा योग असल्यामुळे उमेदवारी जाहीर करीत असल्याचेही सबनीस यांनी सांगितले.
डॉ. सबनीस यांची सांस्कृतिक पुण्याई
मूळ लातूरच्या निलंगा तालुक्यातील हाडोळी येथील डॉ. श्रीपाल सबनीस वैचारिक ग्रंथ व लेखनासाठी परिचित आहेत. त्यांची एकूण २६ ग्रंथसंपदा विविध प्रकाशन संस्थांनी प्रकाशित केली. ज्ञानेश्वर ते आंबेडकर सेक्युलर वाड्मय, अनुबंध, ब्राह्मणी सत्यशोधकाचे अब्राह्मणी सौंदर्यशास्त्र, भारतरत्न आणि बहिष्कृत भारत, उगवतीचा क्रांतिसूर्य आदी ११ ग्रंथ व साहित्य, समीक्षा ग्रंथ, ललित लेखन, विविध लेखकांचे संपादित ग्रंथ, नाटक एकांकिका आदी विविध प्रकारात त्यांनी मुशाफिरी केली. वेगवेगळ्या विचारधारांची चिकित्सा करण्यासाठी क्ष-किरण यंत्र तयार करून विचारवंत व कार्यकर्ता या दोघांना बरोबर घेऊन लढणारा लेखक अशी त्यांची साहित्यक्षेत्रात ओळख आहे.