मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त व्हावा यासाठी शासन दरबारी प्रयत्न सुरू असले तरी ती जगण्याची, उदरनिर्वाहाची भाषा होण्यासाठी लोकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. ती प्रतिभा आपल्याकडे आहे. त्या प्रतिभेमागे शासन खंबीरपणे उभे राहील. मुंबईविषयी मराठी भाषिकांमध्ये चिंतेचे वातावरण असले तरी मुंबई महाराष्ट्राचीच आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावले.
येथील कालिदास कलामंदिरात कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणाऱ्या जनस्थान पुरस्कार सोहळ्यात फडणवीस बोलत होते. फडणवीस यांच्या हस्ते ज्येष्ठ साहित्यिक तसेच पत्रकार अरूण साधू यांना जनस्थान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये, मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल असे आहे. यावेळी फडणवीस यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होत असतांना जगात कोणत्या भाषा स्वीकारल्या गेल्या याचा विचार होण्याची गरज व्यक्त केली. आक्रमक, रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या भाषेला लोकांनी प्राधान्य दिले आहे. मराठी आक्रमक होऊ शकत नसली तरी ती जगण्याची भाषा होण्यासाठी सर्वस्तरावर प्रयत्न होणे आवश्यक आहे, असे फडणवीस यांनी नमूद केले.
सत्काराला उत्तर देतांना अरूण साधू यांनी, विदर्भातील एका माणसाकडून विदर्भस्थित माणसाचा सत्कार होत असल्याचे सांगितले. मी विदर्भातला असलो तरी विदर्भवादी नाही, असा चिमटाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना काढला. मराठी भाषा ज्ञानभाषा होण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे. गेल्या १५-२० वर्षांत तयार झालेले विश्वकोष कुचकामी असून, ते अद्ययावत होण्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा उभी करावी लागेल. त्यासाठी वेगवेगळ्या साहित्य संस्था, विद्यापीठाचे मराठी विभाग, साहित्य मंडळ यांनी अखंड प्रयत्न करावे. शासनाने यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. गेल्या काही वर्षांत मूल्य, संस्कार हरवले असून चंगळवादी, व्यक्तिवादी वृत्ती विपनन तसेच जाहिरातीच्या माध्यमातून वाढीस लागली आहे. चांगल्या कौशल्यावर प्रहार करत लोक कृ त्रिमतेकडे आकर्षित होत आहेत. आपल्या लेखणीला वि. दा. सावरकर, कुसुमाग्रज, माजगांवकर यांनी एक वेगळी दिशा दिली. लिखाणाकडे पाहण्याची दृष्टी दिली. आजूबाजुच्या घटनांमधून लेखक म्हणून नकळत घडत गेलो, असे मनोगत साधू यांनी व्यक्त केले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांनी ज्ञानेश्वरीचे अमृत प्यालेली असल्याने मराठी भाषेची काळजी करण्याची गरज नसल्याचे नमूद केले. काळजी आहे ती फक्त मुंबईतल्या मराठीची. आज मुंबईतल्या महापालिकेच्या मराठी शाळा बंद पडत आहेत. मराठीचा टक्का घसरत आहे. याकडे राज्य सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे. मुंबईत मराठीला धोका आहे. मुंबईत मराठीची स्थिती सुधारावी, ज्ञानकोशसह अन्य काही कामांमध्ये साहित्यिकांची मदत घ्यावी. आमच्याकडे सत्ता नाही पण बुध्दिमत्ता आहे, असा टोला त्यांनी लगावला. यावेळी प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष जब्बार पटेल, ग्रंधालीचे प्रकाशक दिनकर गांगल, पालकमंत्री गिरीश महाजन यांनी मनोगत व्यक्त केले. महापौर अशोक मुर्तडक यांच्यासह प्रतिष्ठानचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. कार्यवाह लोकेश शेवडे यांनी प्रास्ताविक केले. प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष किशोर पाठक यांनी सूत्रसंचालन केले.