कोठे कमालीचे ऊन, तर कोठे अवकाळी पावसाच्या सरी. मात्र, मतदानाचा उत्साह एवढा, की मराठवाडय़ात सरासरी ६५ ते ६८ टक्के मतदान झाले. बीड जिल्ह्यात किरकोळ वादावादीचे प्रकार वगळता सर्वत्र शांततेत मतदान झाले. मराठवाडय़ातील दिग्गजांचे भवितव्य मतदान यंत्रांत बंद झाले. िहगोली जिल्ह्यात ५, बीडमध्ये ४, तसेच नांदेड, परभणी, उस्मानाबाद व लातूर मतदारसंघांत एकूण १२ गावांनी मतदानावर बहिष्कार टाकला. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे, राष्ट्रवादीचे डॉ. पद्मसिंह पाटील, राजीव सातव, अभिनेते नंदू माधव यांच्यासह तब्बल १५१ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले.
उस्मानाबाद, लातूर, बीड, िहगोली व उस्मानाबाद जिल्ह्यांत मतदानादरम्यान अवकाळी पाऊस झाला. उस्मानाबाद जिल्ह्यात वीज पडून एक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. मतदानासाठी सर्वत्र कमालीचा उत्साह होता. सरासरी ६५ ते ६८ टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे. संध्याकाळी पाचपर्यंत सर्वत्र ५५ ते ५८ टक्के मतदानाची नोंद झाली होती. िहगोली जिल्ह्यात सर्वाधिक ५ गावांनी बहिष्कार टाकला. रस्ते व पाण्याचा प्रश्न सोडवा, असा मतदारांचा आग्रह होता.
बीड जिल्ह्यात ४ गावांनी आश्वासनानंतर बहिष्कार मागे घेतला. बेलवाडी गावात केवळ सात जणांनी मतदान केले. बीड मतदारसंघातील ६ केंद्रांवर फेरमतदानाची मागणी भाजपने केली. हाजीपूर, भाळवणी, पारगावसिरस, मिलिया महाविद्यालय व बलभीम महाविद्यालयातील ३ केंद्रांवर फेरमतदान घ्यावे, अशी मागणी करण्यात आली. मतदानानंतर आता कोण निवडून येणार, ही चर्चा रंगली आहे.
उस्मानाबादेत सरासरी ६० टक्क्य़ांहून अधिक
महिनाभरापासून सुरू असलेला लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम गुरुवारी मतदानानंतर संपला आहे. आता सगळी प्रतीक्षा निकालाची आहे. मतदारसंघात सायंकाळी पाचपर्यंत ५५.६१ टक्के मतदान झाले होते. सरासरी ६० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाल्याचा अंदाज आहे. राष्ट्रवादीचे खासदार डॉ. पद्मसिंह पाटील, शिवसेनेचे प्रा. रवींद्र गायकवाड, अपक्ष उमेदवार रोहन देशमुख या प्रमुख उमेदवारांसह २७जणांचे भवितव्य यंत्रबंद झाले. १६ मे रोजी निकाल जाहीर होणार असून सर्वच उमेदवारांनी देव पाण्यात ठेवले आहेत. एकूण १ हजार ९७१ केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. औसा मतदारसंघात ३०३, उमरगा ३०१, तुळजापूर ३७०, उस्मानाबाद ३४५, परंडा ३४३ व बार्शी मतदारसंघात ३०९ केंद्रांवर मतदान पार पडले.
सकाळी सातपासून मतदान केंद्रांवर रांगा दिसून येत होत्या. सकाळी नऊपर्यंत ९.२० टक्के मतदान झाले होते. सकाळी अकरापर्यंत २२.५०, दुपारी एकपर्यंत ३६.४१, दुपारी तीनपर्यंत ४६.१२, तर सायंकाळी पाचपर्यंत ५५.६१ टक्के मतदान झाले. अनेक केंद्रांवर सहानंतरही रांगा असल्याने उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती.
अमरावतीवाडीच्या ग्रामस्थांचा बहिष्कार
तुळजापूर तालुक्यात अमरावतीवाडीच्या ग्रामस्थांनी तुळजाभवानी देवस्थान ट्रस्टच्या शेतजमिनी नावावर कराव्यात, या मागणीसाठी मतदानावर बहिष्कार कायम ठेवला. प्रशासनाकडून वारंवार आवाहन करूनही येथील नागरिक आपल्या मागणीवर कायम राहिले. येथील एकाही मतदाराने मतदानाचा हक्क बजावला नाही.
पाच गावांचा बहिष्कार
हिंगोलीत शांततेत ६० टक्के मतदान
हिंगोली लोकसभा मतदारसंघात ५ गावांमधील मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला. िलबाळा सरहद येथील मतदारांनी गारपिटीचा निधी मिळाला नसल्याच्या कारणावरून बहिष्काराचे अस्त्र उगारले होते. मात्र, तहसीलदार विद्याचरण कडवकर यांनी गावाला भेट देऊन ५ लाख ५० हजारांचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाल्याची माहिती दिल्यानंतर गावातील १९२ शेतकऱ्यांनी मतदान केले. संध्याकाळी पाचपर्यंत संपूर्ण मतदारसंघात ५८.२७ मतदान झाले. मतदान शांततेत पार पडले. गेल्या निवडणुकीत ५९.६० टक्के मतदान झाले होते.
सकाळी सातपासून शांततेत मतदान सुरू झाले. औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार व िहगोलीच्या रिसाला बाजार या दोन केंद्रांवर मतदानयंत्रात तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने काही वेळ मतदान थांबले होते. िलबाळा सरहद गावात ८७२ मतदारांनी गारपिटीचा निधी शेतकऱ्यांना मिळाला नसल्याने मतदानावर बहिष्कार टाकला होता. सकाळी अकरापर्यंत केवळ ३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ही माहिती मिळताच तहसीलदार कडवकर यांनी तात्काळ या गावाला भेट देऊन साडेपाच लाखांचा निधी खात्यावर जमा झाल्याचे पटवून दिल्यानंतर दुपारी तीनपर्यंत १९२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
उमरखेड विधानसभा मतदारसंघातील पाच गावच्या ग्रामस्थांनी रस्त्याच्या मागणीवरून मतदानावर बहिष्कार टाकला. बोरी येथील ७२५, गाडी येथील ३२६, परोटी येथील ३८८, खेर्डी येथील ६५९ तर जवराळा येथील ३११ मतदारांनी बहिष्कार टाकला. बहिष्कार मागे घ्यावा म्हणून निवडणूक अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले. परंतु त्यांच्या प्रयत्नांना अपयश आल्याने पाचही गावांतील ग्रामस्थांनी रस्त्याचे काम पूर्ण झाल्याशिवाय मतदानात भाग घेणार नाही, असे जाहीर केले.
कडक उन्हानंतर पावसाच्या सरी
सर्वत्र कडक ऊन असताना दुपारी चारच्या सुमारास कळमनुरी, औंढा नागनाथ तालुक्यांतील काही गावांत पावसाने हजेरी लावली. वाऱ्यासह हलकासा पाऊस काही वेळ पडला. पण याचा मतदानावर कुठलाही परिणाम झाला नाही.