पश्चिम महाराष्ट्रातील मंत्री टगे आहेत तर मराठवाडय़ातील मंत्री काय गॅसने भरलेले फुगे आहेत? असा सवाल करून दुष्काळ निवारणासाठी अन्याय होत असल्यामुळे मराठवाडय़ातील मंत्र्यांनी राजीनामा देऊन मंत्रिमंडळातून बाहेर पडावे, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज येथे केले.
पक्षप्रमुखपदाची सूत्रे हाती घेतल्यावर येथे दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर घेतलेल्या जाहीर सभेतील गर्दीसमोर प्रारंभीच व्यासपीठावर मस्तक टेकविले आणि सर्वाचे आभार मानले. ते म्हणाले की, ही सभा उद्धव ठाकरे यांची नाही तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची आहे. उपस्थित जमसमुदायास मुठी आवळावयास सांगून ते म्हणाले, की तुमच्या रूपाने बाळासाहेब अजूनही आपल्यात आहेत. ही ताकद आणि हे विराटरूप बाळासाहेबांचेच आहे. शिवसेनेचे काय होणार याची चिंता असणाऱ्यांना आजच्या सभेचे चित्र दाखवावयास पाहिजे.
आमचे हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे, असे सांगून ते म्हणाले की, काँग्रेसवाले मतांसाठी मुस्लिमांची लाचारी करणार असतील, तर आम्ही हिंदूच्या बाजूंनी बोलायचेही नाही का? सगळे मुसलमान वाईट आहेत, असे आम्ही कधीही म्हटलेले नाही, परंतु येथे राहून पाकिस्तानचे गोडवे गाणारांनी निघून जावे, असे का म्हणू नये? केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे भगव्या दहशतवादाची भाषा करीत आहेत. आपल्या मातृभूमीच्या मुळावर येणारा हिंदू असो की मुस्लीम, कुणीही असो त्याला फासावर लटकवा, आमचे काही म्हणणे नाही. शिंदे पुरावे आहे म्हणतात, मग त्या पुराव्यावर कोंबडीसारखे ते का बसले आहेत.
पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ सरकार वेगवेगळा न्याय देते. जास्त दुष्काळी निधी द्यावा, अशी मागणी करून न्याय मिळत नसेल, तर मराठवाडय़ातील मंत्री बाहेर पडले तर आम्ही त्यांचे स्वागतच करू. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्राकडे २२०० कोटींचा दुष्काळी निधी मागितला होता. परंतु तेवढा मिळाला नाही. ते तर सोनिया गांधींच्या घरी पाणी भरीत होते ना? वजन वापरून त्यांनी हा निधी आणावा, असेही ठाकरे म्हणाले.
मराठवाडय़ात दुष्काळ असताना मंत्रिमंडळातील आबा, दादा, बाबा काय करीत आहेत? या नावांची लायकी असणारी ही माणसे आहेत काय? यांची सर्व घालमेल महाराष्ट्र लुटण्यासाठी आहे.
शरद पवार, सुशीलकुमार शिंदे दुष्काळी मराठवाडय़ात का येत नाहीत? मराठवाडय़ात कोण आले तर ज्यांच्या डोक्यावर सिंचन घोटाळ्याचे आरोप आहे ते अजित पवार! मराठवाडय़ातील शेतक ऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे, शेतक ऱ्यांचे वीजबिल माफ करावे, इत्यादी मागण्या त्यांनी या वेळी केल्या