मराठवाडय़ासाठी असलेला दक्षिण-मध्य रेल्वेचा नांदेड विभाग मुंबई येथील मध्य रेल्वेस जोडण्यात यावा यासाठी सोमवारी येथील कृष्णराव फुलंब्रीकर नाटय़गृहात सकाळी १० वाजता मराठवाडा रेल्वे परिषद आयोजित करण्यात आली आहे. जालना रेल्वे संघर्ष समितीने आयोजित केलेल्या या परिषदेच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री बबनराव लोणीकर राहणार असून खासदार रावसाहेब दानवे यांना उद्घाटक म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे.
नांदेड विभाग मध्य रेल्वेस जोडण्याची मागणी जुनीच असून रेल्वे खात्याकडून त्याकडे दुर्लक्ष होत आहे. रेल्वे खात्याने सोलापूर-जालना-जळगाव या प्रस्तावित नवीन रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण केलेले आहे. ४५२ किलोमीटर लांबीचा हा रेल्वेमार्ग टाकण्यासाठी रेल्वे खात्याने तातडीने कार्यवाही करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे जालना-खामगाव हा १५५ किलोमीटर लांबीचा नवीन रेल्वे मार्ग टाकावा, अशी गेल्या अनेक वर्षांची मागणी आहे. मध्य रेल्वेने या मार्गाच्या संदर्भातील प्रस्ताव यापूर्वीच रेल्वे बोर्डाकडे पाठविलेला आहे. मराठवाडय़ातील जनतेच्या सोयीसाठी रेल्वेचा नांदेड विभाग मध्य रेल्वेमध्ये समाविष्ट करण्याची मागणीही गेली अनेक वर्षे करण्यात येत आहे. परंतु रेल्वे खाते मात्र त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहावयास तयार नाही. या शिवाय मराठवाडय़ाशी संबंधित रेल्वेविषयक अन्य मागण्यांच्या संदर्भातही परिषदेत चर्चा होणार आहे असे रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष गणेशलाल चौधरी यांनी सांगितले.
खासदार अशोकराव चव्हाण यांच्यासह मराठवाडय़ातील अन्य खासदार-आमदारांसह स्थानिक आमदार अर्जुनराव खोतकर, माजी मंत्री आमदार राजेश टोपे यांना परिषदेसाठी निमंत्रित केले आहे. माजी आमदार कैलास गोरंटय़ाल या परिषदेचे स्वागताध्यक्ष आहेत.