पाकिस्तानच्या हल्ल्यात शहीद झालेले कन्नड येथील जवान संदीप जाधव यांच्या मुलांचा पदवीपर्यंतच्या शिक्षणाचा भार मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ उचलणार आहे. शिक्षण मंडळाचे सरचिटणीस आमदार सतीश चव्हाण यांनी ही माहिती दिली. संदीप जाधव यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आला. यावेळी सारा गाव शोकाकुल होता.

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी दोन हात करताना शहीद झालेल्या संदीप जाधव यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला. औरंगाबादमधल्या केळगाव येथील गोकुळवाडी वस्तीमध्ये संदीप जाधव यांचं घर आहे. त्यांचे वडील सर्जेराव जाधव सिद्धेश्वर साखर कारखान्यात नोकरीला होते. एकत्रित कुटुंबात आई-वडिल, पत्नी, भाऊ, भावजय, तीन वर्षांची मुलगी मोहिनी आणि एक वर्षाचा मुलगा शिवेंद्र असा परिवार आहे.
शहीद जाधवांची मुलं लहान आहेत. त्यांचं शिक्षण अजून व्हायचं आहे. आता या शिक्षणाचा खर्च मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ करणार असल्याने कुटुंबावरचा आर्थिक ताण हलका झाला आहे.

संदीप जाधव यांचा मुलगा शिवेंद्र याचा आज पहिला वाढदिवस आहे. दुर्दैवाने मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशीच त्याच्या पित्यावर अंत्यसंस्कार करण्याची पाळी त्याच्या कुटुंबावर आली. त्यामुळे येणारा प्रत्येकजण हळहळ व्यक्त करत होता. काल रात्री संदीप जाधव यांचं पार्थिव औरंगाबादमध्ये दाखल झालं होतं. आज त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी आणण्यात आलं आणि शासकीय इतमामात या वीर जवानाला अखेरचा निरोप देण्यात आला.