जिल्ह्य़ात सर्वत्र रविवारी सायंकाळपासून मेघगर्जनेसह व विजांच्या कडकडाटासह गारांचा पाऊस झाल्यामुळे फळबागांचे प्रचंड नुकसान झाले. प्रतिकूल निसर्गामुळे शेतकरी मात्र पुरता गारद झाला आहे. दरम्यान, एकाच दिवशी तिन्ही ऋतूंचा अनुभव रविवारी लातूरकरांनी घेतला. शनिवारच्या पावसामुळे रविवारी सकाळी हुडहुडी भरली होती. दुपारी ऊन आणि सायंकाळी पावसाळाही अनुभवता आला. हवामानातील या विचित्र बदलामुळे शेतकरी संभ्रमात पडले आहेत.
रविवारी सायंकाळी जिल्ह्य़ास गारपिटीने तडाखा दिला. चाकूर तालुक्यातील आष्टा, निलंग्यासह तालुक्यातील जेवरी, िशगनाळ व कार्ला, लातूर तालुक्यातील हरंगुळ व तांदुळजा, अहमदपूर तालुक्यातील किनगाव, चाकूर तालुक्यातील आष्टामोड आदी ठिकाणी गारांचा खच पडला होता. जळकोट तालुक्यात २४ तासांत तब्बल ४५ मिमी पाऊस झाला.
सोमवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्हय़ात सरासरी १५.४२ मिमी पाऊस झाला. जळकोट तालुक्यात ४५, देवणी २६, शिरूर अनंतपाळमधींल उजेड १६, निलंगा तालुक्यातील मदनसुरी ३०, तर कासारशिरसी येथे २४ मिमी पाऊस पडला. चाकूर येथे १८, तर वडवळ येथे १५ मिमी पावसाची नोंद झाली. लातूर तालुक्यातील हरंगुळ येथे ३६, कासारखेडा ३१, लातूर शहर २६, तर तांदुळजात २५ मिमी, औसा तालुक्यात मातोळा २७, बेलकुंड २०, रेणापूर तालुक्यातील पोहरेगाव २९, कारेपूर २८, पानगाव २४, तसेच अहमदपूर तालुक्यातील किनगाव २६, तर अहमदपूर शहरात २२ मिमी पाऊस पडला.
अवकाळी पावसामुळे केळीच्या बागा मोडून गेल्या. उरल्यासुरल्या आंब्याच्या झाडांखाली कैऱ्यांचा सडा पडला. किल्लारी परिसरातील द्राक्ष बागायतदार गेल्या ४ वर्षांपासून निसर्गाच्या रुद्रावतारामुळे चांगलेच त्रस्त झाले आहेत. बाजारात द्राक्षविक्रीला आणण्याच्या वेळी पुन्हा एकदा गारपिटीच्या तडाख्यामुळे द्राक्ष बागायतदार अडचणीत सापडले. पारंपरिक पिकांपेक्षा कमी पाण्यावर फळबाग घेण्याकडे काही प्रगतिशील शेतकरी वळले आहेत. डाळिंब, टरबूज, खरबूज, चिकू अशी पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांचे गारपिटीमुळे अवसानच गळाले आहे.
आर्ट ऑफ लिव्हींग, राज्य सरकार व माजी आमदार पाशा पटेल यांच्या पुढाकाराने औसा तालुक्यात नाला सरळीकरण व रुंदीकरणाची कामे वेगाने सुरू आहेत. रविवारच्या पावसामुळे काही ठिकाणी पाणी साचले. निलंगा तालुक्यातील कलमुगळी येथील शिवारात एक किलोमीटर लांब, ४० फूट रुंद व १२ फूट खोल असे ओढय़ाच्या सरळीकरणाचे काम पूर्ण झाले. उर्वरित काम वेग घेत आहे. रविवारच्या पावसामुळे या संपूर्ण नालाभर पाणी साचले. निसर्गाच्या अवकृपेतून किमान काही चांगले घडले याबद्दल त्या परिसरातील शेतकरी आनंदले आहेत.
बीडला पाचव्या दिवशीही गारपीट
वार्ताहर, बीड
जिल्ह्य़ात सलग पाचव्या दिवशी अवकाळी पाऊस व गारपिटीचा तडाखा कायम होता. दुष्काळात कंबरडे मोडलेल्या आणि तोडक्या सरकारी मदतीने हैराण झालेल्या शेतकऱ्यांना गारपिटीने मात्र पूर्णपणे उद्ध्वस्त केले. धारूर, केज, अंबाजोगाई, माजलगाव, वडवणी या परिसरातील फळबागांचे प्रचंड नुकसान झाले. पोटच्या मुलाप्रमाणे जपलेल्या फळबागा जमीनदोस्त झाल्याने शेतकरी हवालदिल झाला. प्रशासनाने पंचनामे, पाहणीचे आदेश दिले असले, तरी लाखो रुपयांचे नुकसान भरून कशी निघणार, असा प्रश्न पडला आहे.
जिल्ह्यास सलग ३ वर्षांपासून पावसाअभावी दुष्काळी स्थितीला सामोरे जावे लागले. यंदाही सरासरीच्या निम्माही पाऊस न पडल्याने खरीप पीक पूर्ण वाया गेले. सरकारने पॅकेज जाहीर करून फुंकर घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, अजूनही अनेक शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचली नाही. रब्बी हंगामातही हातात आलेले पीक अवकाळी पावसाने जमीनदोस्त करून शेतकऱ्यांच्या अन्नातच माती कालवली.
दुष्काळ व अवकाळी पावसाच्या तडाख्यातून सावरत असलेल्या शेतकऱ्याला पुन्हा ४ दिवसांपासून गारपिटीने झोडपून काढले. वडवणी, धारूर, अंबाजोगाई, माजलगाव, केज परिसरात मोठय़ा प्रमाणात आंबा, डाळिंब, केळी, द्राक्षांच्या बागा आहेत. शेतकऱ्यांनी अनेक व्यापाऱ्यांना फळ देण्याचे करार करून पसे उचलले. महिनाभरात फळे व्यापारी घेऊन जाणार असल्याने शेतकरी समाधानी होते. मात्र, ५ दिवसांपासून सुरू झालेल्या गारपिटीने काही क्षणात होत्याचे नव्हते केले.
अवकाळीचा कहर संपेना
जिंतूरला झाड पडल्याने माय-लेक जखमी
वार्ताहर, परभणी
गंगाखेड व जिंतूर तालुक्यांत अवकाळी पावसाने कहर केला आहे. विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्याचे तांडव व मुसळधार पावसाची हजेरी असेच सलग चौथ्या दिवशीचे चित्र होते. मानवत तालुक्यास सोमवारी गारांच्या पावसाने झोडपून काढले. जिंतूर तालुक्यात दुपारी दोनच्या दरम्यान अर्धा तास पाऊस झाला. वाऱ्यामुळे घरांवरील पत्रे उडण्याबरोबरच झाडे कोसळली. जिंतूरमध्ये झाड अंगावर पडल्याने महिलेसह मुलगा जखमी झाला.
दुष्काळानंतर आता अवकाळी पावसाने घाला घातला आहे. रब्बी हंगामात उरल्या-सुरल्या पिकांवर अवकाळी संकट कोसळल्यानंतरही निसर्ग पाठ सोडायला तयार नाही. गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. तापमान ४० अंशावर जाऊन पुन्हा २९ अंशांवर घसरले. मागील ४ दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडत आहे. केवळ पाऊसच नाही, तर सोबतीला वादळी वाऱ्याचे तांडव सुरू आहे. सलग चौथ्या दिवशी गंगाखेड, जिंतूर तालुक्यांत वादळी वाऱ्याने कहर केला. जोरदार वारे वाहू लागल्याने घरांवरील पत्रे उडण्यासोबतच झाडे पडण्याच्या घटना घडल्या.
वाऱ्यामुळे गंगाखेड तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले. वाडी-तांडय़ावरील, तसेच गंगाखेड शहरात शाळेवरील पत्रे उडाले. भू-विकास संस्था कार्यालयावरील पत्रे शनिवारी रात्री उडून गेले. वीज खांबही मोडून पडल्याने तालुक्यातील अनेक गावांची वीज खंडित झाली. शनिवारी रात्री सोनपेठ तालुक्यास गारपिटीने झोडपले. तालुक्यातील कोठाळा गावात अनेकांच्या घरांवरील पत्रे उडाल्याने गावकऱ्यांनी शाळेत आश्रय घेतला. गावात एका ठिकाणी वीज पडल्याने घराचे मोठे नुकसान झाले.
पावसाचे तांडव रविवारी रात्रीही सुरू होते. जिंतूर शहर व तालुक्यात वादळी वाऱ्याने धुमाकूळ घातला. गंगाखेडमध्येही रात्रभर पावसाची रिपरिप होती. जिंतूर शहरातील जुन्या ललित जििनग समोरील जुने िलबाचे झाड वाऱ्याने मोडून पडले. या वेळी झाडाखाली थांबलेली महिला व तिचा लहान मुलगा जखमी झाला. रात्री साडेसातच्या सुमारास हा प्रकार घडला. सोमवारी दिवसभर तालुक्यात पावसाची रिपरिप होती. दुपारी दोनच्या सुमारास मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. मानवत शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी दुपारी दोनच्या दरम्यान गारांचा पाऊस झाला. बोराएवढय़ा गारा पडल्या. परभणी शहरातही पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.
वीज पडून दोन गायी मृत्युमुखी
जांबजवळील आळंद परिसरात सोमवारी चारच्या सुमारास गारपीट झाली. या वेळी वीज पडल्याने जनार्दन किशनराव टेकाळे यांच्या दोन गायींचा मृत्यू झाला.
१२२ जनावरांचा मृत्यू
अवकाळी पावसाचे मराठवाडय़ात ९ बळी
प्रतिनिधी, औरंगाबाद
शनिवारपासून पुन्हा सुरू झालेल्या गारपिटीत मराठवाडा अक्षरश: होरपळला आहे. या दरम्यान नऊजणांचा मृत्यू झाला, तसेच ५४ लहान व ६८ मोठय़ा जनावरांचा मृत्यू झाला. घरांचीही मोठय़ा प्रमाणात पडझड झाली. औरंगाबाद व जालना जिल्ह्य़ांत पडझडीचे प्रमाण अधिक आहे. गारपिटीने अजूनही पिच्छा सोडला नाही. त्यात सोमवारी पुन्हा वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. परिणामी झाडे उन्मळून पडली. गारपिटीमुळे भाजीपाल्यासह टरबूज, खरबुजाचे मोठे नुकसान झाले.
औरंगाबाद जिल्ह्य़ातील कन्नड, खुलताबाद व सिल्लोड तालुक्यांत मोठय़ा प्रमाणात गारपीट झाली. १६ गोठय़ांची पडझड झाली. घरांचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. औरंगाबाद, लातूर जिल्ह्य़ांत वीज पडून प्रत्येकी एकाचा, तर नांदेड व जालना जिल्ह्य़ांत प्रत्येकी दोघांचा वीज पडून मृत्यू झाला. दुभती जनावरे व भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाल्याने अडचणीत सापडलेला शेतकरी चांगलाच वैतागला आहे. सोमवारी गारपीट होईल, असा हवामान खात्याचा अंदाज होता. औरंगाबाद जिल्ह्य़ात सोमवारी विविध ठिकाणी पाऊस झाला. शहरातही सायंकाळच्या सुमारास झालेल्या पावसामुळे हवेत कमालीचा गारवा जाणवत होता. मराठवाडय़ातील किती गावांत गारपीट झाली, याची माहिती मात्र विभागीय आयुक्तालयात नव्हती. ती मिळविण्याचे काम नव्याने सुरू झाले आहे.