अत्यल्प पावसामुळे इरई धरण केवळ ६५.९६ टक्के भरल्याने येत्या काळात एक हजार मेगाव्ॉटच्या विस्तारित प्रकल्पातून वीज निर्मिती सुरू केल्यास उन्हाळ्यात महाऔष्णिक वीज केंद्राच्या २३४० व १००० अशा दोन्ही प्रकल्पाला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. त्याचा थेट परिणाम वीज निर्मितीवर होऊ शकतो, अशीही शक्यता वर्तवली जात आहे.
या जिल्ह्य़ाची पावसाची सरासरी ११४२ मि.मी. असतांना यावर्षी केवळ ५०.३ टक्के म्हणजे निम्मा पाऊस झाला आहे. त्याचा परिणाम या जिल्ह्य़ातील सर्वात मोठे इरई धरण केवळ ६५.९६ टक्के भरले आहे. इरई धरणाची क्षमता १६०.२४५ द.ल.घ.मी. आहे, परंतु यंदा पावसाअभावी धरणात केवळ १०४.८९२ द.ल.घ.मी. पाणी आहे. याच धरणातून साडेतीन लाख लोकसंख्येच्या चंद्रपूरलाही पाणी पुरवठा केला जातो. एकाच वेळी वीज केंद्र व शहराला पाणी पुरवठा होत असल्याने धरणातील पाण्याची पातळी झपाटय़ाने कमी होत आहे. दुसरीकडे पावसाने दिर्घ विश्रांती घेतल्याने धरणातील पाण्याच्या पातळीत गेल्या महिन्याभरात एक टक्क्यानेही वाढ झालेली नाही. ऑगस्ट संपायला अवघे ४८ तासांचा अवधी आहे. त्यामुळे केवळ सप्टेंबर तेवढा पावसाचा शिल्लक राहिलेला आहे. मात्र, सप्टेंबरमध्ये सरासरी पाऊस कमीच पडतो, असा आजवरचा इतिहास आहे.
या जिल्ह्य़ाचा विचार केला तर जुलै व ऑगस्ट या दोनच महिन्यात चांगला पाऊस होतो. मात्र, पावसाचे हे दोन्ही महिने अक्षरश: कोरडे गेल्याने आता कठीण परिस्थिती आहे. अशातच डिसेंबर किंवा जानेवारीत महाऔष्णिक वीज केंद्राच्या एक हजार मेगाव्ॉटचा विस्तारित प्रकल्प सुरू केल्यास २०१५ च्या उन्हाळ्यात महाऔष्णिक वीज केंद्राच्या २३४० व १००० अशा दोन्ही प्रकल्पाला पाणीटंचाईचा तीव्र सामना करावा लागणार आहे. त्याचा परिणाम थेट वीज निर्मितीवर होण्याची शक्यता अधिकारी आतापासूनच बोलून दाखवित आहेत. या प्रकल्पालाही याच धरणातून पाणी पुरवठा होणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित या प्रकल्पाला कमी प्रमाणात पाणी लागले तरी धरणात पाणी साठाच अत्यल्प असल्याने भविष्यात करायचे काय, असा प्रश्नही पडू शकतो. अशा परिस्थितीत दोन्ही वीज प्रकल्पांना पाणीटंचाईची झळ सोसावी लागेल, असे अधिकारीच बोलत आहेत. त्यामुळे किमान इरई धरणाच्या कॅचमेंट एरियात किंवा चारगाव धरण परिसरात तरी मुसळधार पाऊस व्हावा, असे तज्ञांचे मत आहे. यावर्षी धरण शंभर टक्के भरले नाही तर पाणीटंचाईची समस्या वीज केंद्राला हमखास भेडसावणार आहे. त्यामुळे वीज केंद्राचे अधिकारी आतापासूनच कामाला लागले आहेत. सध्या तरी हे अधिकारी पावसाच्या प्रतीक्षेत असून पाऊस झाला नाही, तर भविष्यात आवश्यक त्या उपाययोजना कराव्या लागतील, असे ते सांगत आहेत.