ज्याचे सागरावर प्रभुत्व त्याचे भूमीवर प्रभुत्व ही बाब ओळखून छत्रपती शिवाजी महाराजांनी सागरी आरमार मजबूत केले. मराठा आरमाराच्या वैभवशाली इतिहासाचे साक्षीदार असणाऱ्या सागरी किल्ल्यांचे महत्त्व लोकांना कळावे या उद्देशाने पुणे ते कारवार सागरी मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. यात सुमारे १००हून अधिक मोटारसायकलस्वार सहभागी झाले आहेत. बुधवारी या मोहिमेचे आगमन अलिबागेत झाले. दर्यावर्दी सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे यांनी या मोहिमेचे स्वागत केले. मोहिमेतील सहभागींनी शिवाजी महाराजांना अभिवादन करून कान्होजी आंग्रे यांच्या समाधीचे दर्शन घेतले. अलिबागच्या समुद्रातील कुलाबा किल्ल्याला भेट दिली. दुपारी ही मोहीम मुरुडमाग्रे रत्नागिरीकडे रवाना झाली. या मोहिमेत महत्त्वाच्या ६९ सागरी ठिकाणांना भेट देण्यात येणार आहे.
अजमल कसाब आणि त्याच्या साथीदारांनी केलेला २६-११चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला असो किंवा ९३ मध्ये झालेले साखळी बॉम्बस्फोट असो, प्रत्येक वेळी किनारपट्टीचा वापर करण्यात आला, हे लक्षात घेता सागरी किल्ल्यांचे महत्त्व जनतेला कळावे यासाठी या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. असे या मोहिमेत सहभागी झालेल्या तेजस काळे यांनी सांगितले. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष हेमंत दांडेकर आणि शहर अध्यक्ष सुनील दामले यावेळी उपस्थित होते.