खगोल अभ्यासकांसाठी आणि खगोलप्रेमींसाठी एप्रिल महिना चंद्रग्रहण, सूर्यग्रहण, उल्का वर्षांव आदींची मेजवानी घेऊन आलेला आहे. उद्या, ८ एप्रिलला मंगळ ग्रह प्रतियुतीत राहणार असून, यादिवशी पश्चिमेकडे सूर्य मावळताच मंगळ ग्रह पूर्वेकडून उगवताना दिसणार आहे.
सूर्यमालेतील मोठी उल्का (ग्रहिका) व्हेस्टा (५२५ कि.मी. व्यासाची) साध्या डोळ्याने ताऱ्यासारखी दिसणार आहे, तर मोठी ग्रहिका दुर्बिणीने पाहावी लागणार आहे. १४ एप्रिलला मंगळ ग्रह पृथ्वीच्या जवळ येणार असून, सर्वाधिक तेजस्वी दिसेल.
प्रत्येक २६ महिन्यांनी मंगळ ग्रह पृथ्वीजवळ येतो. यावेळी तो ९२ दशलक्ष कि.मी. अंतरावर असेल. सूर्याच्या अगदी विरुद्ध बाजूला मंगळ ग्रह असून, १४ एप्रिलला पृथ्वी व मंगळावरील अंतर कमी होणार आहे.
१५ एप्रिलला खग्रास चंद्रग्रहण होणार आहे, पण ते भारतात दिसणार नाही. दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्युझीलंड व पॅसिफिक देशातून ते दिसेल. १६ ते २५ एप्रिलदरम्यान पहाटे लायरिक उल्का वर्षांव पहायला मिळेल.
२२ एप्रिलला सर्वात जास्त ताशी ५० उल्का दिसण्याची शक्यता आहे. २२ एप्रिललाच खग्रास सूर्यग्रहण होणार आहे, पण ते केवळ दक्षिण गोलार्धातील ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया येथून आंशिक, तर अंटार्टिकामधून खग्रास दिसेल.
या महिन्यात बहुतेक ग्रह आकाशात पाहता येतील. सूर्य मावळताच मंगळ ग्रह पूर्वेकडून कन्या तारासमूहात उगवेल. तेव्हा गुरू ग्रह मध्य आकारात, मिथुन तारासमूह, तर शनी रात्री १० वाजेनंतर पूर्वेकडून तुळ तारासमुहात उगवेल. पहाटे सूर्योदयापूर्वी बुध, शुक्र व नेपच्युन ग्रह मीन व कुंभ तारासमूहात पाहता येईल.
एकाच महिन्यात इतक्या खगोलीय घटना घडण्याची ही पहिलीच वेळ असल्यामुळे खगोल विज्ञानप्रेमींनी या घटनांचा आनंद घ्यावा, असे आवाहन स्काय वॉच ग्रुप इंडियाचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी केले आहे.