हे शुभवदना सांबनंदना, आद्य पूजेचा मान तुम्हा… या पारंपरिक नांदीच्या आगळ्या सादरीकरणाने रंगमंचाचा चमकदार मखमली पडदा वर गेला आणि माउली सभागृह नगरकरांच्या रंगसेवेत रुजू झाले! नव्या नाटय़गृहाला साजेशा थाटात या नांदीचे सूर सभागृहभर घुमले.
सावेडी रस्त्यावर जिल्हा तलाठी संघाने बांधलेल्या माउली सभागृहाचे बुधवारी अहमदनगर महाकरंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेने अनौपचारिक उदघाटन होऊन येथील रंगदरबार ख-या अर्थाने सुरू झाला. शहरात तब्बल चाळीस वर्षांनी दुसरे नाटय़गृह अस्तित्वात आले. अमित बैचे या हरहुन्नरी रंगकर्मीने पारंपरिक नांदीला आधुनिक साज चढवून मराठमोळ्या वातावरणात नव्या रंगमंचावर पहिली सेवा रुजू केली. रंगमंचाचा पडदा प्रथमच वर गेल्यानंतर पारंपरिक मराठी पोशाखातील २२ कलाकारांनी नांदीद्वारे गणरायाची आराधना केली. यात आठ वादक आणि १६ गायकांचा समावेश होता. पुरुष कलाकारांचे धोतर-झब्बा आणि महिला कलाकारांची नऊवारी साडी, नथ अशा पारंपरिक वेषात उपस्थितांना ‘घाशीराम कोतवाल’च्या नांदीची आठवण करून दिली. नव्या रंगमंचाचा प्रारंभच या नांदीने अतिशय मंगल वातावरणात झाला.
या पारंपरिक नांदीला अमित बैचे यांनी आधुनिक संगीताचा साज चढवून आगळ्या पध्दतीने तिचे सादरीकरण केले. नांदीला ड्रमसेट, गिटार आणि मराठमोळ्या ढोलाची साथ त्यांनी दिली. या वाद्यांनी नवे सभागृह काही काळ थरारून उठले. त्याचे साक्षीदार होते- प्रसिध्द नाटय़ दिग्दर्शक केदार शिंदे, अभिनेते तथा ‘हार्बेरियम’फेम सुनील बर्वे आणि ज्येष्ठ अभिनेते राजन ताम्हाणे यांच्यासह तलाठी संघाचे अध्यक्ष आर. एम निमसे, सभागृहाचे अध्यक्ष बी. एम. हिंगे, विश्वस्त डी. ए. घोडके, या स्पर्धेचे संयोजक तथा उद्योजक नरेंद्र फिरोदिया, स्वप्नील मुनोत, या नाटय़गृहाचे व्यवस्थापक तथा ज्येष्ठ रंगकर्मी पी. डी. कुलकर्णी. प्रसाद बेडेकर यांनी या छोटेखानी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सुरुवातीला या पाहुण्यांच्या हस्ते नटराजाची पूजा झाली, घोडके यांच्या हस्ते नव्या सभागृहातील रंगमंचावरचा पहिला नारळ वाढवण्यात आला आणि सुरू झाली नांदी…
आज औपचारिक उदघाटन
जिल्हा तलाठी संघ विश्वस्तांच्या नाटय़प्रेमामुळेच शहरात दुस-या व अद्ययावत नाटय़गृहाची उभारणी होऊ शकली. नगरकरांनी त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत, अशाच प्रतिक्रिया शुभारंभाच्या वेळी उपस्थितांमध्ये उमटल्या. बुधवारी येथे स्पर्धेला सुरुवात झाली असली तरी सभागृहाचे औपचारिक उदघाटन गुरुवारी सकाळी १० वाजता राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या हस्ते होणार आहे. ज्येष्ठ नाटय़-सिने अभिनेते डॉ. श्रीराम लागू व दीपा श्रीराम तसेच नितीन करीर, एकनाथ डवले, उमाकांत दांगट, संजीवकुमार या वरिष्ठ सनदी अधिका-यांसह जिल्हाधिकारी अनिल कवडे, पोलीस अधीक्षक लखमी गौतम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल आदी या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहे.
‘आम्ही कोते!’
शहरातील रंगकर्मी, नाटय़प्रेमी गेली वर्षानुवर्षे दुस-या नाटय़गृहाच्या प्रतीक्षेत होते. त्यासाठी रंगकर्मीचा सतत संघर्षही सुरू आहे. नगरकरांची ही भूक जिल्हा तलाठी संघाच्या या माउली सभागृहाने निश्चिचतच भागवली. विशेष म्हणजे नव्याने विस्तारलेल्या सावेडी भागात दुसरे नाटय़गृह व्हावे, अशीच नगरकरांची इच्छा होती. तीही फलद्रूप झाली. मात्र नेमक्या या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे, कार्यक्रमाला हजेरी लावावी, असे रंगकर्मीना वाटले नाही. विशेषत: नाटय़ परिषदेच्या पदाधिका-यांनीही इकडे पाठच फिरवली. अपवाद सोडला तर बहुतेकांनी मूळ कोत्या मनोवृत्तीचेच दर्शन या निमित्ताने घडवले.