जिल्हय़ात पुरेशा पावसाअभावी निर्माण झालेल्या टंचाई परिस्थितीमुळे राज्य सरकारने टंचाई निवारणार्थ घ्यावयाच्या उपाययोजनांना पुन्हा महिनाभराची मुदतवाढ दिली आहे. ही वाढीव मुदत आता ३१ ऑगस्टअखेर आहे. दरम्यान जिल्हय़ात टँकरची संख्याही वाढू लागली आहे. एकूण ३६४ टँकरने जिल्हय़ातील २६४ गावे, १ हजार १९६ वाडय़ावस्त्यांवरील सुमारे ६ लाख १५ हजार लोकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे.
दरम्यान, टँकरने पाणी पुरवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारकडे आणखी १६ कोटी रुपयांची मागणी केली आहे. नजीकच्या काळात हा निधी लवकर उपलब्ध न झाल्यास टँकरच्या इंधनाचा प्रश्न निर्माण होऊन त्याचा परिणाम पाणीपुरवठय़ावर होणार आहे. गेल्या आठवडाभरात टँकरची संख्या १५ने वाढली आहे. आणखी पाच ठिकाणच्या टँकर मागणीचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल झाले आहेत.
राज्य सरकारच्या स्थायी आदेशानुसार टंचाई निवारणार्थ करावयाच्या उपाययोजनांची मुदत ३० जून होती. मात्र जूनच्या सुरुवातीच्या आठवडय़ात झालेल्या पावसाने नंतर दडी मारली, त्यामुळे कमी झालेले टँकर पुन्हा सुरू करण्याची वेळ प्रशासनावर आली. कमी झालेल्या टँकरचे प्रस्ताव मंजूर करण्याचे अधिकार जरी तहसीलदारांकडे असले तरी नव्याने मंजूर करण्याचे अधिकार अद्याप जिल्हाधिकाऱ्यांकडेच आहेत.
श्रीरामपूर व राहुरी तालुक्यात अद्यापि टँकरची मागणी झालेली नाही अकोल्यातील टँकर बंद झाले आहेत. इतर तालुक्यांमधील टँकरची संख्या पुढीलप्रमाणे : संगमनेर २६. कोपरगाव १, नेवासे १४, राहाता १, नगर २९, पारनेर ६६, पाथर्डी ७५, शेवगाव ४२, कर्जत ५३ (कर्जत न.प.साठी आणखी १२), जामखेड ३० व श्रीगोंदे १५
घोसपुरीतील पाणीपुरवठा बंद
विसापूर तलाव कोरडा पडल्याने नगर तालुक्यातील घोसपुरी प्रादेशिक पाणी योजनेतून १८ गावांना होणारा पाणीपुरवठा उद्यापासून (शनिवार) बंद केला जाणार आहे. त्यामुळे सुमारे ५० हजार लोकसंख्येला टँकरने पाणी पुरवावे लागेल. या योजनेतील गावांना तातडीने टँकर मंजूर करावा किंवा कुकडीचे आवर्तन सोडून विसापूर तलाव भरावा, अशी मागणी पंचायत समितीचे सभापती संदेश कार्ले यांनी केली आहे. कुकडीचे आवर्तन सोडण्याचा प्रस्ताव जलसंपदा विभागाकडे जिल्हा प्रशासनाने पाठवला असला तरी प्रत्यक्ष पाणी विसापूर तलावात पोहोचण्यास किमान १५ दिवसांचा कालावधी लागेल, तोपर्यंत टँकर द्यावेत अशी मागणी त्यांनी केली.