रत्नागिरी शहरात येत्या वर्षभरात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी जाहीर केला.आव्हाड यांनी सोमवारी दिवसभर शहरातील खासगी व जिल्हा शासकीय रुग्णालयाची पाहणी केली. तसेच वैद्यकीय तज्ज्ञांशी चर्चा केली. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, वैद्यकीय महाविद्यालयासाठी पाचशे खाटांचे रुग्णालय आवश्यक असते. परकार हॉस्पिटल, चिरायू हॉस्पिटल आणि जिल्हा शासकीय रुग्णालय मिळून ही गरज पूर्ण होऊ शकते.
इंडियन मेडिकल कौन्सिलच्या क्लस्टर पद्धतीमध्ये या प्रकाराला मान्यता मिळू शकते. शहरात महाविद्यालय बांधण्यासाठी शासकीय जमीन सहज उपलब्ध आहे. त्यामुळे येत्या वर्षभरात सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन पुढील शैक्षणिक वर्षांपासून महाविद्यालय सुरू होऊ शकेल.    राज्यातील सध्याच्या आघाडी सरकारचे अवघे दोन महिने शिल्लक असताना हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वास जाण्याची खात्री कशी बाळगता येईल, असे विचारले असता आव्हाड म्हणाले की, विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा आमचेच सरकार येणार आहे आणि मी व रत्नागिरी जिल्ह्य़ाचे पालकमंत्री उदय सामंत नवीन मंत्रिमंडळामध्ये असल्यास हा प्रकल्प चिकाटीने पाठपुरावा करून पूर्णत्वास नेऊ. तसेच सरकार बदलले म्हणून आधीच्या सरकारने घेतलेले निर्णय रद्दबातल होण्याचे कारण नाही. वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठी आवश्यक सुविधा निर्माण करणे व तांत्रिक बाबींची पूर्तता केल्याचे प्रमाणपत्र केंद्रीय समित्यांकडून मिळवणे एक वर्षांत होऊ शकेल काय, असे विचारले असता आव्हाड यांनी, पाठपुरावा केल्यास काहीही अशक्य नाही, असे उत्तर दिले.
राणेंच्या राजीनाम्यावर भाष्य नाही
आव्हाड रत्नागिरीत असतानाच राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त येऊन थडकले. त्याबाबत त्यांची प्रतिक्रिया विचारली असता कोणतेही ठोस भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला. तसेच सावंतवाडीचे राष्ट्रवादीचे बंडखोर आमदार दीपक केसरकर यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबतचे प्रेम बेगडी असल्याचे सूचित केले.