घरकुल घोटाळ्यातील आरोपी आमदार सुरेश जैन यांना वैद्यकीय उपचारासाठी १६ दिवसांची रजा मंजूर करण्यात आली आहे.धुळे कारागृहात असणाऱ्या आ. जैन यांनी २१ जुलै ते २८ ऑगस्ट २०१४ या कालावधीसाठी रजा देण्याची विनंती केली होती. मात्र, त्यास सरकारी वकील शामकांत पाटील यांनी हरकत घेतली. त्यानंतर विशेष न्या. आर. आर. कदम यांनी जैन यांना २१ जुलै ते ६ ऑगस्टपर्यंत रजा मंजूर केली. तसेच माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या वैद्यकीय रजेतही वाढ करण्यात आली आहे.
या काळात जैन यांच्या मुलांच्या नावे असलेल्या मुंबई येथील घरात धार्मिक अनुष्ठान होणार आहे. त्यामुळे २१ जुलै रोजी सकाळी आठ वाजता आ. जैन कारागृहातून बाहेर पडतील. त्यानंतर सहा ऑगस्टला पुन्हा धुळे कारागृहात हजर होण्याचे निर्देश त्यांना देण्यात आले आहे.