जिल्हय़ातील शेतकरी दुष्काळामुळे आत्महत्या करू लागला आहे तरीही या प्रश्नावर सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी मौन बाळगून असल्याने जिल्हय़ात दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शिष्टमंडळ शनिवारी मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याची माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांनी पत्रकारांना दिली.
राज्य सरकारने शेजारच्या जिल्हय़ात छावण्या, चारा डेपो मंजूर केले, मात्र दुष्काळ असूनही जिल्हा वंचित ठेवला आहे. शेवगाव-पाथर्डी तालुक्यात दुष्काळामुळे काल दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. दुष्काळ भयाण स्वरूपाचा आहे, मात्र सत्ताधारी पक्षाचे तसेच शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातील आमदार मौन बाळगून आहेत. एकीकडे ‘मन की बात’ म्हणायचे आणि दुष्काळ, शेतकऱ्यांच्या आत्महत्या यावर मौन बाळगायचे अशी भूमिका घेतली जात आहे, अशी टीका घुले यांनी केली.
जिल्हय़ासाठी भंडारदरा, कुकडीचे आवर्तन सोडण्यात आले, मात्र तीव्र टंचाई असूनही मुळा धरणाचे आवर्तन नेवासे, राहुरी, पाथर्डी, शेवगावसाठी सोडले जात नाही. पिण्यासाठी व चाऱ्यासाठी पाणी सोडावे, अशी मागणी करत शेतकरी आत्महत्या करू लागला आहे. जिल्हा परिषद अध्यक्षांनी पत्र दिले आहे. पाथर्डी, शेवगावसह राहुरी पंचायत समितीनेही मागणीचे ठराव केले आहेत, तरीही त्याची दखल घेतली जात नाही, याकडे घुले यांनी लक्ष वेधले. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन मुळाचे आवर्तन सोडण्याची मागणी केली.
जिल्हय़ात दुष्काळ जाहीर करावा, चारा डेपो व छावण्या सुरू कराव्यात, विद्यार्थ्यांचे परीक्षाशुल्क माफ करावे, शेतकऱ्यांचे कर्ज व शेतीचे वीजबिल माफ करावे, या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले
लवकरच मुळाचे आवर्तन
नेवासे तालुक्यासाठी येत्या दोन दिवसांत आवर्तन सोडण्याचे लेखी आश्वासन, जलसंपदा विभागाशी संपर्क साधल्यावर जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी दिल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष घुले यांनी दिली.