खडसेंचे भाकीत; योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्यात भाजपला अपयश

वस्तू व सेवा कर कायद्याच्या मंजुरीसाठी आयोजित करण्यात आलेल्या विधिमंडळ अधिवेशनात ‘कटाप्पा’ आणि ‘बाहुबली’ चर्चेमुळे सर्वाचे पुन्हा एकदा लक्ष वेधून घेतलेले माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी तीन वर्षांत विद्यमान सरकारने राबविलेल्या योजना तळागाळातील माणसांपर्यंत पोहोचविण्यात पक्ष कमी पडल्याचा घरचा आहेर भाजपला दिला. बहुतांश शेतकऱ्यांना शासनाच्या महत्वाकांक्षी योजनाच माहीत नसल्याचा दावा करीत कधीही मध्यावधी निवडणुका होण्याचे भाकित खडसे यांनी केले.

येथील एका हॉटेलमध्ये मंगळवारी दुपारी काही वेळ ते थांबले होते. यावेळी त्यांनी अनौपचारिक चर्चेत विविध विषयांना स्पर्श केला. मंत्री जयकुमार रावल, डॉ. विजयकुमार गावीत यांच्यासह अनेकांचा आपण पक्षप्रवेश घडवून आणला. भाजप हा पूर्वीसारखा राहिलेला नसून आता मोठा पक्ष झाला आहे. पक्ष प्रवेश मोठय़ा प्रमाणात झाल्याने साहजिकच आता पक्षाचे कुटुंब मोठे झाले. यामुळे कुरबुरी वाढल्या. भाजप नेतृत्वाने आता जुन्या, नव्या कार्यकर्त्यांवर जबाबदाऱ्या नक्की करायला हव्यात, असा सल्ला खडसे यांनी दिला.

खान्देशचा विकास होईल अशा योजना राबविण्यात येत असल्या तरी या योजना किती प्रभावी आहेत याबाबत माहिती देण्यात पक्ष कार्यकर्ते कमी पडत आहेत. अनेक ठिकाणी सिंचन प्रकल्प पूर्णत्वास येऊनही परिसरातील शेताच्या बांधावर पाणी पोहचत नाही. महाराष्ट्राच्या सर्वागीण विकासासाठी या भागातील सर्वानी एकत्र येणे आवश्यक आहे.

दिल्ली-मुंबई ‘इंडस्ट्रियल कॉरिडोर’सारख्या प्रकल्पाचे काम संथपणे सुरू असून प्रकल्पा जाणाऱ्या जमिनींना योग्य मोबदला मिळत नसल्याची ओरड आहे. यामुळे जमीन अधिग्रहणही हव्या तेवढय़ा गतीने होत नसल्याबद्दल खडसे यांनी खंत व्यक्त केली. शेतकऱ्यांना अपघात झाल्यावरही दोन लाखाची मदत सरकारकडून मिळू शकते. पण याचा लाभ किती जणांना झाला, असा प्रश्न करीत त्यांनी सरकारी योजनांच्या अपेक्षित जनजागृतीबद्दल नाराजी व्यक्त केली.

भाजप नागरिकांच्या भेटीसाठी संवाद यात्रा आणि शेतकऱ्यांना योजना समजावून सांगण्यासाठी शिवार योजना राबविणार आहे. यावेळी प्रत्यक्ष बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या भेटी घेण्यात येतील, असे त्यांनी नमूद केले.

कृषी विद्यपीठासाठी माजी आमदार शरद पाटील माझ्याशी भांडत होते. आता कोणाशी भांडणार ? पूर्वीप्रमाणे आपण निर्णय प्रRियेतील घटक असतो तर धुळे किंवा जळगाव यापैकी कुठल्याही एक ठिकाणी हे विद्यपीठ झालेच असते. आता मात्र विरोध कोणाला करणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यावेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील नेरकर, योगेश मुकुंदे हे उपस्थित होते.

मंत्री नसल्याने विकासावर परिणाम

आपण मंत्रिमंडळात नसल्याने उत्तर महाराष्ट्राच्या विकासावर परिणाम झाला आहे. माजी मंत्री रोहिदास पाटील हे विरोधक असले तरी त्यांनीही त्यांच्या कारकिर्दीत चांगली कामे केल्याचे खडसे यांनी सांगितले.