शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्याच्या दिशेने राज्य सरकारने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारने दिलासा दिला असून दुधाच्या खरेदी दरात प्रति लिटर तीन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. गाय आणि म्हशीच्या दुधासाठी हे नवे दर लागू होणार आहेत. दुधाच्या खरेदी दरात वाढ करण्यात आली असली तरी याचा बोजा सर्वसामान्य ग्राहकांवर पडणार नाही.

शेतकरी संपामुळे दूध दराचा प्रश्न ऐरणीवर आला होता. सन २०१२-१३ पासून दूध धंद्यासमोर अनेक प्रश्न तयार झाले होते. उत्पादन खर्च जास्त आणि दर कमी यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित जुळत नव्हते. सलग तीन-चार वर्षे दुष्काळ टिकून राहिल्याने पशुधन कमी झाले. त्यामुळे निकृष्ट प्रतीच्या चाऱ्यामुळे गाई भाकड राहिल्या. अशा संकटात सापडलेल्या दूध उत्पादकांना खरेदी दरात वाढ हवी होती. अखेर दूध उत्पादकांची ही मागणी मार्गी लागली आहे.

पशु, दुग्ध व मत्स्य विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या प्रदत्त समितीने खरेदी दरातील वाढीला मान्यता दिली. दूधाच्या खरेदी दरात ३ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. यानुसार गाईच्या दुधाचा खरेदी दर २४ रुपयांवरुन २७ रुपये तर म्हशीच्या दुधाचा खरेदी दर ३३ रुपयांवरुन ३६ रुपये एवढे करण्यात आले आहे. कृषी मूल्य आयोग उत्पादन खर्चावर आधारित शेतमालाचे हमीदर जाहीर करते, पण भाजीपाल्याप्रमाणेच दुधाचे दर जाहीर केले जात नाहीत. यावर तोडगा निघाला असून आता प्रदत्त समिती वर्षातून एकदा बैठक घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. या बैठकीत दूधाच्या दराचा आढावा घेतला जाणार आहे.