राज्यातील १३५ लाख हेक्टर खरीप क्षेत्रापकी ९१ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. ६८ टक्के पेरणी होऊनही पावसाअभावी पिके माना टाकत आहेत. आणखी ४ दिवसांत समाधानकारक पाऊस न झाल्यास गंभीर स्थिती ओढवण्याची भीती आहे.
गोंदिया, भंडारा, कोल्हापूर, सातारा व कोकण या भागात कदाचित थोडा पाऊस झाला तर पिके तगतील. मात्र, अमरावती व औरंगाबाद विभागांतील पिकांची स्थिती गंभीर आहे. जुलअखेर पाऊस झाल्यास दुबार पेरणीस बी-बियाणे उपलब्ध करणे, शेतकऱ्यांना या हंगामात कोणती पिके घेता येतील याची माहिती देणे ही कामे कृषी विभागामार्फत गावपातळीपर्यंत केली जाणार असल्याचे कृषी आयुक्त विकास देशमुख यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. येत्या २० जुलपर्यंत हवामानात कोणताही बदल होण्याचा अंदाज नाही. जुलअखेर थोडासा बदल झाला, तरी ऑगस्टमध्ये पुन्हा मोठा खंड असल्यामुळे खरीप हंगाम हातचा पुरता गेलेला असेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी हंगामावर लक्ष केंद्रित करावे, असा सल्ला पुणे येथील ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी दिला.
गेल्या काही वर्षांपासून जूनमध्ये पाऊस कमी होत असला, तरी जुलमधील पाऊस त्याची कसर भरून काढत असे. या वर्षी जुल पावसाविना जात गेल्यामुळे उडीद, मूग, कापूस पिकांचा पेरा करणे शक्य नाही. जुलअखेर पेरणीयोग्य पाऊस झाल्यास तूर, सोयाबीन पिकांचा पेरा होऊ शकतो. मात्र, किमान १०० मिमी पाऊस होणे अपेक्षित आहे. थोडासा पाऊस झाला व पुन्हा खंड पडला, तर पेरणीचा कोणताही उपयोग होणार नाही. ज्या शेतकऱ्यांनी पेरा केला, त्यांनी दुबार पेरणीच्या तयारीसाठी पिके मोडावयास सुरुवात केली आहे. ऑगस्टमध्ये पावसाचा खंड असला, तरी सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस होईल व त्याचा लाभ रब्बीपेरणीसाठी होईल, असे भाकीत साबळे यांनी वर्तविले.
परभणीच्या वसंतराव नाईक कृषी विद्यापीठातील कृषी हवामानशास्त्र प्रकल्पाचे समन्वयक प्रल्हाद जायभाय म्हणाले की, २० जुलपर्यंत हवामानात कोणताही बदल अपेक्षित नाही. दर दहा दिवसांनी हवामानात होणाऱ्या बदलाची माहिती सांगता येते. हवामान विभागाकडे सध्या जी यंत्रणा आहे त्यानुसार ढोबळमानाने हवामानाचा अंदाज व्यक्त करता येतो. दीर्घकालीन हवामान अंदाज व्यक्त करण्यासाठी हवामान विभागामार्फत यंत्रणा विकसित करण्याचे काम सुरू आहे. या बाबत विकसनशील अशी स्थिती असल्यामुळे दीर्घकालीन अंदाज अधिकृत यंत्रसामुग्रीमार्फत सांगता येत नाही.
मराठवाडय़ात दुष्काळी स्थिती आहेच. आगामी काळात पावसाने सरासरी पूर्ण केली, तरी त्याचा शेतीसाठी कोणताही उपयोग होणार नाही. पाणीपातळी वाढेल, जनावरांना चारा मिळेल. मात्र, खरीप हंगाम हातचा गेला असल्याचे जायभाय म्हणाले. हलक्या-मध्यम जमिनीतील पिके वाळून गेली आहेत. दुबार पेरणीस लागणारा पाऊस पडेल काय? पाऊस पडल्यास नेमके काय पेरायचे? पिकांचे योग्य उत्पादन मिळेल काय? याबद्दल निश्चित कोणी सांगू शकत नसल्यामुळे मराठवाडय़ात दुष्काळाची स्थिती असल्याचे जायभाय म्हणाले.