मजलिस ए इत्तिहादुल मुसलमीन, अर्थात एमआयएम पक्षात लवकरच संघटनात्मक बदल होणार आहेत. मुंबई व उर्वरित महाराष्ट्रासाठी स्वतंत्र अध्यक्ष असतील. एवढेच नाही, तर महापालिकेसह सर्व निवडणुकांमध्ये बसपची मदत घेता येईल का, याची चाचपणी केली जात आहे. या वृत्तास एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी दुजोरा दिला. बसपबरोबर बोलणी करण्याचा विचार सुरू आहे. मात्र, ही चर्चा फारच प्राथमिक स्तरावर आहे. पण असे झाल्यास औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीत त्याचा परिणाम जाणवेल, असेही सांगितले जात आहे.
औरंगाबाद शहरातील काँग्रेस, राष्ट्रवादीच्या मुस्लिम नगरसेवकांनी एमआयएमची वाट धरली. मात्र, पाठबळ वाढविण्यासाठी दलित- मुस्लिम समीकरण जुळवून आणणे एमआयएमच्या नेत्यांना आवश्यक वाटू लागले आहे. दलित संघटनांमध्ये वेगवेगळे गट आहेत. एका गटाशी बोलणी केल्यास दुसरा नाराज होतो. त्यामुळे तशी राज्य पातळीवर कोणाशी चर्चा नाही. मात्र, राज्यातील बसप मतदानाची टक्केवारी पाहता हा मतदार एमआयएमसह आल्यास राजकीय समीकरणे बदलण्याची ताकद निर्माण होईल, असा दावा आमदार जलील करतात.
जवखेडय़ातील तिहेरी हत्याकांडानंतर खासदार असदोद्दीन ओवेसी यांची भेट, औरंगाबादमधील विविध वार्डात होणारी चाचपणी या प्रक्रियेचा भाग मानली जात आहे. दरम्यान, एमआयएमने पक्ष संघटनेतही काही बदल करण्याचे ठरविले आहे. मुंबईसाठी स्वतंत्र अध्यक्ष असेल, तर उर्वरित महाराष्ट्राचा अध्यक्ष औरंगाबाद शहरातून निवडला जाण्याची शक्यता आहे. औरंगाबाद मध्य व पूर्व विधानसभा मतदारसंघात ज्या पद्धतीने काम केले गेले, त्यामुळे अनेकांना हे पद मिळावे असे वाटते. त्यामुळेच या अनुषंगाने निर्णय झाला नाही. येत्या काही दिवसांत तो होईल, असे आमदार जलील म्हणाले.