अल्पसंख्याक मतांवर असणारी काँग्रेसची भिस्त ‘एमआयएम’च्या प्रवेशामुळे कमालीची अधोरेखित करणारा निकाल औरंगाबाद मध्य मतदारसंघातील निवडणुकीत दिसून आला. ‘अच्छा आदमी’ अशी जाहिरातीतून प्रतिमा घडविणाऱ्या राजेंद्र दर्डा यांचा पराभव  काँग्रेसच्या डोळ्यात अंजन घालणारा ठरावा, असे चित्र आहे. काँग्रेसविरोधाच्या लाटेत एमआयएमच्या प्रवेशामुळे मराठवाडय़ातील पुढील निवडणुकांचे चित्र बदलत राहील, असे सांगितले जात आहे. राजकीय पटावरील खेळ बदलविणारा पक्ष म्हणून एमआयएमकडे  पाहिले जात आहे.
औरंगाबाद पूर्वमधील मतमोजणी दरम्यान या पक्षाचे डॉ. गफार कादरी १७ व्या फेरीपर्यंत आघाडीवर होते. राजेंद्र दर्डा मात्र तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. मुस्लिम समाजात या पक्षाविषयी कमालीचे औत्सुक्य दिसून येत होते. असदुद्दीन ओवेसी व त्यांच्या भावाने शहरात घेतलेल्या दोन सभांमध्ये शिवसेनेवर एका शब्दानेही टीका केली नव्हती. धोरणीपणे केलेल्या या चढाईचा परिणाम एवढा होता की, काही नगरसेवकांनी केवळ पतंग चालवा असाच संदेश दिला. पतंग ही या पक्षाची निशाणी आहे.
राजेंद्र दर्डा यांच्याविरोधात एवढे वातावरण होते की, त्यांची हेटाळणी करणाऱ्या अनेक उपमा त्यांना मुस्लिम वस्त्यांत दिल्या जात होत्या. अल्पसंख्याक समाजातील सुशिक्षित वर्गही या पक्षामागे असेच चित्र निकालानंतर स्पष्ट झाले. औरंगाबाद मध्य व औरंगाबाद पूर्व या दोन्ही मतदारसंघांत अन्य पक्षाकडून उभ्या असणाऱ्या एकाही व्यक्तीला शंभर मतांची गोळाबेरीजही करता आली नाही. काँग्रेसकडून वापरल्या जाणाऱ्या ‘धर्मनिरपेक्ष’ या शब्दाचा प्रभाव संपल्यासारखे वातावरण दिसून आले.
या विजयाबाबत बोलताना इम्तियाज जलिल म्हणाले, ‘‘धर्माच्या नावावर भय दाखवून मत मागितले जात होते. काँग्रेस व राष्ट्रवादीने नेहमी मुस्लिमांना गंडविले, हे आम्ही सांगितले. त्याचेच हे फळ आहे.’’
दरम्यान, पहिल्यांदाच काँग्रेसचा मतदार अन्य पक्षाकडे एकगठ्ठा गेल्याच्या चित्राने येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसला ताकही फुंकून पिण्याची वेळ येणार आहे.

‘एमआयएम’चा प्रवास
* हैदराबादचे नबाब मीर उस्मान अली खान यांच्या सूचनेवरून नबाब महमूद नवाझ खान किलेदार यांच्याकडून १९२७ मध्ये पक्षाची स्थापना.
* हैदराबाद संस्थान स्वतंत्र भारतात विलीन होऊ नये यासाठी दीड लाख रजाकार. 
* १९४८ मध्ये एमआयएमवर बंदी आणि त्यांचे नेते कासीम रिझवी १९४८ ते १९५७ पर्यंत अटकेत.
* सुटकेनंतर अब्दुल वाहिद ओवैसी यांच्याकडे पक्षाची सूत्रे सोपवून रिझवी यांचे पाकिस्तानात स्थलांतर.
अब्दुल वाहिद ओवैसी यांच्याकडून पक्षाची पुनर्बाधणी.
* १९६२ मध्ये पाथरघट्टी विधानसभा मतदारसंघात सुलतान सलाहुद्दीन ओवैसी यांच्या विजयाद्वारे एमआयएमचा आंध्र प्रदेशच्या राजकारणात प्रवेश.
* १९८४ मध्ये हैदराबाद लोकसभा मतदारसंघात सुलतान ओवैसी यांची सरशी.
* यानंतर आजपर्यंत हा मतदारसंघ एमआयएमच्याच ताब्यात.
* एप्रिल २०१४ मध्ये तेलंगणा विधानसभेच्या ९ जागांवर एमआयएमचा विजय.
एमआयएमला निवडणूक आयोगाची मान्यता.
* २००७ मध्ये बांगलादेशची लेखिका तस्लिमा नसरीन यांच्यावर एमआयएमच्या कार्यकर्त्यांचा हैदराबादमध्ये हल्ला.