माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सोलापूर महापालिकेतील सत्ताधारी काँग्रेसमधून सात नगरसेवक फुटून शिवसेनेत दाखल झाल्यानंतर माजी महापौर आरीफ शेख यांनीही शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर टीकेची तोफ डागत भाजपमध्ये प्रवेश घेतला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे आरीफ शेख हे भाजपमध्ये दाखल झाले असताना गुन्हेगारी पाश्र्वभूमी लाभलेले त्यांचे धाकटे बंधू तौफिक शेख हे ‘एमआयएम’ची धुरा सांभाळत आहेत.

आरीफ इस्माईल शेख हे १९९७ पासून महापालिकेत प्रतिनिधित्व करीत आहेत. यापूर्वी त्यांनी महापौरपदही भूषविले होते. परंतु यंदाच्या पालिका निवडणुकीत शेख यांना काँग्रेसकडून पुन्हा संधी न देता डावलले जाण्याची चिन्हे दिसू लागताच त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी तातडीने पालकमंत्री विजय देशमुख यांची भेट घेतली असता त्यांच्यात झालेल्या चर्चेनंतर शेख हे भाजपमध्ये दाखल झाले.

आरीफ शेख व त्यांचे थाकटे बंधू तौफिक शेख यांचे रेल्वे लाईन्स, पोर्टर चाळ, फॉरेस्ट भागात बरेच प्रस्थ आहे. तौफिक शेख यांची गुन्हेगारीची पाश्र्वभूमी असताना त्यांच्यासह आरीफ शेख यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांची मर्जी सांभाळली होती. तौफिक शेख हेसुध्दा नई जिंदगी भागातून महापालिकेवर निवडून आले होते. परंतु दिवंगत नेते विष्णुपंत कोठे यांचा हात धरून राजकारणात आल्यानंतर पुढे कोठे यांचा सुशीलकुमार शिंदे यांच्याबरोबर काडीमोड झाला. तेव्हा गत विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तौफिक शेख यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा वाढल्या आणि ते थेट एमआयएममध्ये दाखल झाले. त्यांनी एमआयएमच्या माध्यमातून शहर मध्य विधानसभा निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात कडवी झुंज दिली. योगायोगाने त्या मतदारसंघात शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेऊन विष्णुपंत कोठे यांचे पुत्र महेश कोठे हे पुढे आले. यात एमआयएमच्या माध्यमातून काँग्रेसच्या पारंपरिक मतांचे विभाजन करण्याचा डाव कोठे यांनी खेळण्याचा प्रयत्न केल्याचे आजही बोलले जाते. या संघर्षांत अखेर प्रणिती शिंदे यांचा कसाबसा विजय झाला.

तथापि, आमदार प्रणिती शिंदे यांनी कोठे यांच्यासह ‘एमआयएम’चे तौफिक शेख यांचा काँग्रेसमध्ये परत येण्याचा मार्ग बंद केला आहे. एवढेच नव्हे तर मागील विधानसभा निवडणुकीत आपल्या विरोधात तौफिक शेख यांना मदत केल्याच्या संशयावरून आमदार प्रणिती शिंदे यांनी माजी महापौर आरीफ शेख यांचे पंख छाटायला सुरुवात केली. त्यातूनच शेख यांना काँग्रेसमधून बाहेर पडत भाजपचा रस्ता धरावा लागला. इकडे भाजपनेही गुन्हेगारी पाश्र्वभूमी लाभलेल्या ‘एमआयएम’च्या नेत्याच्या भावाला जवळ करीत त्याचे शुध्दीकरण केल्याचे दिसून आले. या संदर्भात आरीफ शेख यांनी आमदार प्रणिती शिंदे ह्य़ा सोलापुरात काँग्रेस पक्ष संपविण्याला निघाल्याचा आरोप केला.