राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक मंत्री वादाच्या भोवऱ्यात अडकले असतानाच शालेय शिक्षण राज्यमंत्री फौजिया खान यांनी दक्षिण आफ्रिकेतील सफारीदरम्यान केलेल्या शिकारीची छायाचित्रे एका संकेतस्थळावर टाकण्यात आल्याने राष्ट्रवादीची पुन्हा कोंडी झाली आहे. वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या मुद्दय़ावरून भाजप, शिवसेनेने पुढील आठवडय़ात विधिमंडळात आवाज उठविण्याचे संकेत दिल्याने फौजिया खान अडचणीत येणार आहेत. यापूर्वी राष्ट्रवादीचेच धर्मराव बाबा आत्राम अशाच शिकार प्रकरणात अडकल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागला होता.
 फौजिया खान दरवर्षी दक्षिण आफ्रिकेत सहकुटुंब सफारीसाठी जातात. यंदाही त्या दक्षिण आफ्रिकेतील उमिलिलोच्या जंगलात सफारीसाठी जाऊन आल्या. तेथे त्यांनी रायफलीने गवा, काळविट, झेब्रा आणि अन्य एका प्राण्याची शिकार केली. रक्ताळलेल्या प्राण्यासमवेतची स्वत:ची छायाचित्रे एका संकेतस्थळावर अपलोड केली. यात फौजिया खान निरपराध वन्यप्राण्यांच्या मृतदेहांवर बंदूक ठेवून शिकाऱ्याच्या वेशात अभिमानाने बसल्याचे दिसत आहे. त्यांच्यासमवेत अन्य चार-पाच पर्यटकही आहेत.
भारतात वन्यजीवांच्या शिकारीवर कायद्याने बंदी आहे. परंतु, देशातील एका राज्याची महिला मंत्री विदेशात जाऊन शिकार करून त्याची छायाचित्रे अपलोड करीत असल्याने भारताविषयी अत्यंत वाईट असा संदेश जगभर गेला आहे, अशी टीका शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांनी केली. भाजपचे माजी आमदार बाबासाहेब लोणीकर यांनी फौजिया खान यांच्या राजीनाम्याची मागणी केली असून, मंत्र्याने निरपराध वन्यजीवांची हत्या करणे कुठल्या कायद्यात बसते, असा सवाल केला आहे.
फौजिया खान यापूर्वी २६/११च्या मुंबई हल्ल्यातील लष्करे तैयबाचा दहशतवादी अबु जुंदाल याच्याशी संबंध असल्याच्या वादात सापडल्या होत्या. त्याचा त्यांनी इन्कार केला. आता त्या वन्यजीव शिकार प्रकरणात थेट अडकल्याने अधिवेशनाचा पुढील आठवडा फौजिया खान यांच्याभोवतीच केंद्रित होईल, अशी चिन्हे दिसत आहेत. अशा प्रकरणांचा पाठपुरावा केल्याशिवाय दोषींना कठोर शिक्षा होत नाही, याकडे मानद वन्यजीव संरक्षक कुंदन हाते यांनी लक्ष वेधले. सातपुडा फाऊंडेशनचे संस्थापक व वन्यजीव मंडळाचे सदस्य किशोर रिठे यांनीही या प्रकरणात मंत्र्यांची कसून चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे.      

फौजिया खान यांची सारवासारव
सहकुटुंब दक्षिण आफ्रिकेच्या सफारीने गेल्याची कबुली फौजिया खान यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली. परंतु, संकेतस्थळावर टाकण्यात आलेली छायाचित्रे वैयक्तिक असून, शिकार मी केलेली नाही, अशी सारवासारव त्यांनी केली. दक्षिण आफ्रिकेत शिकार कायदेशीर आहे, असेही त्यांनी नमूद केले.