अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याच्या आरोपावरून मुंगी (ता. शेवगाव) येथील तरुणास व त्याच्या वडिलांना सत्र न्यायालयाने सात दिवसांच्या (दि. २५पर्यंत) पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश सोमवारी दिला. दोघे आरोपी गेल्या अडीच वर्षांपासून फरार होते.
विशेष जिल्हा न्यायाधीश ए. झेड. ख्वाजा यांनी हा आदेश दिला. सरकारतर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील सुरेश लगड यांनी काम पाहिले. राम अर्जुन घोरपडे (वय २३) व अर्जुन बन्सी घोरपडे अशी दोघा आरोपींची नावे आहेत. २४ ऑक्टोबर २०११ रोजी ही घटना घडली. मुलगी चेडे चांदगाव येथील आहे.
राम याने १५ वर्षांच्या मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले व तिच्यावर बलात्कार केला, ही मुलगी गरोदर राहिल्यानंतर अर्जुन घोरपडे याने मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असूनही राम याचे मुलीशी जेजुरी येथे मंदिरात विवाह लावून दिला. त्यानंतर त्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या दवाखान्यात मुलीचे खोटे वय सांगून बाळंतपण केले. तिला एक मुलगी झाली. यासंदर्भात मुलीच्या वडिलांनी शेवगाव पोलिसांकडे फिर्याद दिली. उपनिरीक्षक देवीदास नेरकर यांनी काल दोघांना अटक केली. आरोपींची डीएनए चाचणी करण्यासाठी पोलीस कोठडीची गरज असल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले.